Wednesday, February 27, 2013

मराठी साहित्यात कर्जबळींची उपेक्षा



                                                          शिवाजी कांबळे
लातूर : मराठी साहित्यात बोटावर मोजण्या इतपत लेखक, साहित्यिकांनी शेतक-यांच्या आत्महत्या अर्थात कर्जबळींची दखल घेतलेली आहे. परिस्थितीचे वर्णन केले गेले पण परिस्थितीला कलाटणी देणारे साहित्य निर्माण झाले नसल्याची खंत आठव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनातील  कर्जबळी शेतक-यांचे मराठी साहित्यातील दर्शन सत्यशोधकी दृष्टिकोनातून, या विषयावरील परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केली.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार नेते भाई प्रा. एस. व्ही. जाधव हे होते तर किशोर ढमाले, प्रा. अर्र्जुन जाधव, कॉ. धनाजी गुरव आदी वक्त्यांनी परखड मांडणी केली. शेतक-यांच्या प्रश्नांची दखल साहित्यात अलिकडे घेतली जाऊ लागली आहे. १९८० पासून शेतीमालाचे भाव कोसळू लागले. राज्यकत्र्यांनी जाणीवपूर्व शेतीक्षेत्राला तोट्यात ढकलले. गॅट, डंकेल नंतर शेती क्षेत्रात मोठा हस्तक्षेप वाढला त्यामुळे शेती उत्पादन कमी होत चालले तेव्हापासून शेतक-यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. कर्जबळी हा सरकारच्या देशातील शेती विषयक धोरणांचा परिपाक होता, असे मत किशोर ढमाले यांनी मांडले. शिवाय मराठी साहित्यात कर्जबळी शेतक-यांची दखल घेतली गेली नाही. शेतक-यांच्या विरोधात चित्रण केले गेले. एकमेव रा. रं. बोराडे यांची चारापणी कादंबरी सोडली तर शेतक-यांची दखल कोणी घेतली नसल्याचे दिसते, असेही त्यांनी सांगितले. कॉ. धनाजी गुरव यांनी शेतक-यांच्या आत्महत्याच नव्हे तर भूमिहीन शेतमजुरांना साहित्यात स्थान मिळालेले नाही. लेखकांचे आकलन व्यापक झाले पाहिजे. आदिवासी, भटके, भूमिहिन, शेतमजुरांचे प्रश्न वेशीवर टांगणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. परिवर्तवादी साहित्य, सत्यशोधकी साहित्य निर्माण होणे ही सामुदायिक जबाबदारी असल्याचे मत त्यांनी मांडले तर प्रा. अर्जुन जाधव यांनी स्वतंत्र भारतात शेतजमिनीचे क्रांतिकारी फेरवाटप झाले नाही. उत्पादनखर्च वजा जाता जे उत्पादन राहिल त्यातून पाच जणांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. ग्रामीण भागातून साहित्य संमेलने झाली पाहिजेत. शेतक-यांच्या व्यथा त्यातून मांडणे गरजे आहे. चिपळूणच्या साहित्य संमेलनात तर कु-हाड दाखविण्यात आली. अशा साहित्य संमेलनाला शेतक-यांच्या खिशातून ७५ लाख रुपये खर्च करण्यात येतात, ही बाब अत्यंत लाजीरवाणी असल्याचे मत प्रा. जाधव यांनी मांडले. अध्यक्षीय समारोपात प्रा. एस. व्ही. जाधव यांनी शेतक-यांचा आक्रोश न ऐकू येणा-या साहित्यिकांचा आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला. शेतकरी कुटुंबातून आलेले लेखक साहित्यिकांच्या लेखनीतून शेतक-यांचा टाहो, आक्रोश उतरत नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत देशात २ लाख ४० हजार शेतकèयांनी आत्महत्या केल्या. मराठी साहित्याला याचे काहीच गांभीर्य दिसून येत नाही. वेदनेला वाचा फोडणारी लेखणी महात्मा फुले यांची होती. चार वेद, १८ पुराणे आणि सहा शास्त्रांत डांबून ठेवलेला समाज मुक्त करण्याचा विचार महात्मा फुले यांनी मांडला पण हा विचार कृतीत आणण्याची गरज आहे. आताशा शेतक-यांची पोरे रस्त्यावर उतरून लढताना दिसत नाहीत. दिनकरराव जवळकर आणखी १५ वर्षे जगले असते तर शेतक-यांमध्ये क्रांती निर्माण झाली असती, असे प्रा. जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Translate