Wednesday, February 27, 2013

सुधीरचा स्वप्नरंगी रंगलेला कुंचला !



....................................................
 ग्राम संस्कृती आणि मानवी भाव-भावनांना चित्रांतून जिवंत करणारा, ब्रश आणि रंगांच्या साह्याने कॅनव्हॉसवर आपली स्वप्ने उतरविणारा मराठी पिकासो सुधीर बांगरची ही यशकथा...
..............................................
सुप्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे, की
उपजिविकेसाठी आवश्यक असणाèया विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. अशाच एका चित्रकलेशी मैत्री जमवलेल्या चित्रकाराबद्दल.... सुधीर सूर्यभान बांगर असे या चित्रकाराचं नाव. सद्या पुण्यातील भोसरीत राहत असलेला  आणि मुळ उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बांगरवाडी सारख्या छोट्याशा खेड्यातला हा चित्रकार. सुधीरने आज महाराष्टातील सुप्रसिद्ध चित्रकार म्हणून ख्याती मिळवली आहे. गावच्या उदास माळरानावर ब्रश आणि रंगाच्या साह्याने ग्रामीण जीवनाच्या मनमोहक छटा आणि माणसांच्या मनातील भाव-भावनांची चित्रे रेखाटत सुधीरचा स्वप्नरंगी कुंचला आज देश-विदेशातील कलारसिकांना भारावतो आहे.
 शालेय जीवनात अनेकांना चित्रकलेची आवड असते. पण कांही कारणांमुळे अनेकांना ही आवड जोपासायला सवड मिळत नाही. पण या आवडीमध्ये करिअर करणाèयांपैकी सुधीर आहे. सन १९९२ मध्ये सुधीरने लातूर येथून चित्रकला शिक्षकाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सन १९९६ मध्ये पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून जी.डी आर्ट ही पदवी मिळवली. सुरुवातीच्या काळात सुधीर निसर्गचित्र काढत असे. त्यानंतर  तो रंगरेषाच्या माध्यमातील चित्रांकडं वळला. या शैलीतून माणसांमधील भाव-भावना चित्रबद्ध करु लागला. याच विषयाशी संबंधित त्याचा लव्ह अ‍ॅण्ड लाइफ या नावाचे चित्रप्रदर्शन मुंबईतील के. सुभाष मार्गावरील काला घोडा येथील द म्युझियम गॅलरी येथे भरलं. या चित्रप्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. श्रृंगार हा या विषयाचा पाया होता. विवाहानंतर माणसाचं आयुष्य बदलतं. पती-पत्नीमधील सुरुवातीच्या काळातील शृंगारिक जीवनाचे परिवर्तन कालांतराने भावनिक एकरुपतेत होतं. या नातेसंबंधात होणारा बदल सुधीरने चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे सुधीर सांगतो. प्रेम आणि जीवनाचा सुंदर अविष्कार चित्रातून साकारण्याची सुधीरची कल्पना मोहक अशीच आहे. सुधीरनं लव्ह अ‍ॅण्ड लाइफ ची अनेक ठिकाणी प्रदर्शनं भरवली. यात बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आर्ट वर्कशॉप कोल्हापूर, साउथ सेंट्रल झोन नागपूर, ओक आर्ट एक्झिबिशन ग्रुप शो लातूर, बालगंर्धव कलादालन, पुणे, जे. जे. स्कूल, विमाननगर, मुंबई, आर्ट प्लाझा, मुंबई, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणची सुधीरची चित्रप्रदर्शनं चांगलीच गाजली. देशातील प्रसिद्ध आर्ट गॅलरी जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे सुधीरच्या चित्रांची तीन वेळा प्रदर्शने झाली. ग्रामीण भागातील सौंदर्य उलगडणारी कलाकृती सुधीरने कॅनव्हॉसवर उतरवली आहे. त्याने आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून ब्युटी ऑफ आर्ट च्या निमित्ताने चित्रकार सुधीरने ग्रामीण स्त्रीच्या रांगडेपणाचं आणि अप्रतिम सौंदर्याचं दर्शन घडवून आणले आहे. आजही एकविसाव्या शतकात ग्रामीण भागात मुलगी जन्माला आली तर तिची राजरोसपणे हत्या केली जाते. गर्भातच अनेक कळ्या खुडल्या जातात. परिणामी मुलींची संख्या कमी होताना दिसते. या सगळ्या प्रथा मोडून काढ्ण्यासाठी सुधीरने त्याच्या चित्रात स्त्रीभू्रणाची पूजा करताना दाखवले आहे. सुधीर केवळ चित्रकार नाही तर समाजqचतकही आहे. सामाजिक बांधिलकी असणारा हा युवा चित्रकार समाजातील विविध घडामोडींबद्दल तेवढाच संवेदनशील आहे. सुधीरची काही निवडक चित्रे संग्रहासाठी अमेरिका, दक्षिण कोरिया, स्वित्र्झलँड, फ्रान्स, मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकात्ता आदी ठिकाणी पाठविली आहेत. हा ध्येयवेडा मराठी पिकासाची यशाची आनंदमयी वाटचाल मंत्रमुग्ध करणारी आहे.

                                                                                    .........शिवाजी कांबळे

                                                                                                       ९०११३०८५८०

No comments:

Post a Comment

Translate