Wednesday, March 7, 2018

जगातली पहिली शिवजयंती...



महाराष्ट्राचे हृदयस्थान, स्फुर्तीस्थान, चैतन्य व बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 388 वी जयंती आपण यंदा 19 फेबु्रवारीला साजरी करत आहोत. या पार्श्‍वभूमीवर जगात पहिली शिवजयंती कोणी साजरी केली? आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? महाराजांवर पहिले पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्‍नाची उत्तरे म्हणजे शिवजयंतीमागील खरा इतिहास आहे. जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले होत आणि छत्रपती शिवरायांवर पहिले पुस्तक लिहिणारे देखील महात्मा फुलेच होत. मात्र खरा इतिहास दडपून षडयंत्री मनुवादी लेखक आणि इतिहासकारांनी इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास आमच्या माथी मारण्याचे काम होत आलेले आहे. आम्ही आतापर्यंत दुसर्‍याच्या डोक्याने चालत आलो, वागत आलो. पण डॉ. आ. साळुंके म्हणतात त्याप्रमाणे, आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल. बहुजनांची मुले आता इतिहास आणि विविध ग्रंथांची चिकित्सा करू लागले आहेत. संशोधन करू लागली आहेत. खरे काय आणि खोटे काय हे पुराव्यासह सिद्ध करू लागली आहेत. वाचू, लिहू आणि बोलू लागली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती महात्मा फुलेंनी रायगडावर साजरी केली. हे काहींना माहित झालेले आहे, तर काही अजूनही या माहितीपासून दूरच आहेत. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले त्यांना तात्याही म्हणत. त्यांना शिवरायांच्या स्वराज्याची वैदिकांनी चालवलेली विटंबना पाहवेना, म्हणून 1869 साली रायगडावर गेले. शिवजयंती सुरु करण्यासाठी त्यांनी महाराजांची अडगळीत, झाडाझुडपातील समाधी शोधून काढली. ही समाधी शोधण्यासाठी फुलेंना तीन दिवस लागले. वेली तोडून घाणेरी काढली. समाधी स्वच्छ केली. महाराजांच्या समाधीवर म. फुलेंनी फुले वाहून भक्तीभावाने अभिवादन केले. ही गोष्ट रायगडवाडीच्या ग्रामभटाला कळली तेव्हा या भटाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो समाधीजवळ आला, समाधीवरी फुले जोशाने लाथेने बाजूला सारली आणि म. फुलेंना म्हणाला, ङ्गअरे कुणबटा! त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस काय? तो काय राजा होता होय? म. फुले आणि शिवरायांना भट अर्वाच्य भाषेत बोलू लागला. म. फुलेंना या भटाचा रागही आला आणि दुःखही वाटले. पण म. फुले यांनीच ही जगातील पहिली शिवजयंती साजरी केली. तेव्हांपासून महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्याची परंपरा निर्माण झाली. पण मनुवादी ब्राह्मण लोक मात्र म्हणतात महाराजांची पहिली जयंती बाळ गंगाधर टिळकांनी केली. टिळकांचा जन्म 1859 चा आणि 1869 मध्ये म्हणे  त्यांनी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. मग सांगा-1869 म्हणजे टिळक असतील चौथी किंवा पाचवीला, मग एवढ्या लहान वयात त्यांनी कशी सुरु केली शिवजयंती? प्रसिद्ध इतिहास संशोधक, महात्मा फुलेंचे अभ्यासक विचारवंत प्रा. हरि नरके यांनी म. फुलेंनीच पहिली शिवजयंती साजरी केल्याचे संशोधन केलेले आहे.  तसेच महाराजांवर 1 जून 1869 रोजी पहिले पुस्तक महात्मा फुलेंनीच लिहीले. शिवरायांवर खूप चांगला पोवाडा लिहिला. या सगळ्यावरून एकच सिद्ध होते की शिवाजी महाराजांची जयंती टिळकांनी सुरु केली नाही तर ती महात्मा फुलेंनीच सुरु केली.1870 साली पुण्यासह संपूर्ण महाराराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहाने सुरु झाली. पेशव्यांच्या समर्थकांना याची चीड आली, पण ते शिवजयंतीला थेट विरोध करु शकत नव्हते. कारण म. फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराराष्ट्रात फार मोठी जागृती केली होती. शिवजयंतीला थेट विरोध करणे अशक्य असल्याने त्यांनी पर्याय दिला. तो पर्याय म्हणजे गणोत्सव! गणपती हा पेशव्यांचा देव आहे. बहुजनसमाजाचा गणपतीशी काहीही संबंध नाही. पण पेशव्यांचे कैवारी बाळ गंगाधर टिळकाने शिवजयंतीला रोखण्यासाठी पेशव्यांच्या खाजगी गणपतीचा सार्वजनिक उत्सव सुरु केला. म्हणजे टिळकाने शिवजयंती संपावी यासाठी 1893 साली गणोत्सव सुरु केला.
 याबाबत महाराष्ट्रातील तमाम मराठा, कुणबीसह बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार साळी, कोळी,  दलित, आदिवासी, जाती,जमाती अशा सगळ्या बहुजन समाजात जागृती निर्माण व्हायला हवी. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवारायांना आदर्श मानले, त्या महात्मा फुलेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले. ही वैचारिक गुंफन समग्र बहुजनांनी समजून घेतली तर जाती-पातीची मनामनातील जळमटे दूर होऊ शकतील.

-शिवाजी कांबळे, लातूर
मो. 8459789944

dainik yuva chhatrapati, latur
..................................................

Translate