Wednesday, July 16, 2014

विठ्ठलपूजेचा अर्थपूर्ण वाद

समतावादी लोकराजे, बहुजनांचे कैवारी राजर्षि शाहू महाराजांचे १८९९ मध्ये वेदोक्त-पुराणोक्त प्रकरण गाजले होते. शाहू महाराजांच्या स्नानाच्या वेळी नारायण शास्त्री हे शूद्रांसाठीचे पुराणोक्त मंत्र म्हणत होते, ही बाब राजाराम शास्त्री भागवत यांनी उजेडात आणली होती. शाहू महाराजांच्या क्षत्रियत्वाला  आमच्या लेखी कवडीची qकमत नाही, असे नारायण शास्त्रींनी म्हटले होते. हा वाद महाराष्ट्रात अनेक वर्षे सुरू होता. या वादामुळेच शाहू महाराजांनी ब्राह्मणांचा वर्णश्रेष्ठत्ववादी संकल्प
धुडकावला. त्यामुळेच त्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाले. आता असाच एक वाद सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. तो म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पूजेवेळी म्हटले जाणारे पुरुषसुक्त मंत्र हे जातीयवादी, चातुर्वण्र्यव्यवस्थेचे समर्थन करणारे असून ते बदलावेत आणि त्याऐवजी संत तुकारामांचे मंगल चरण आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हटले जावे, अशी मागणी विठ्ठल-रुक्मिणी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष भारत पाटणकरांनी केली. खरे तर ही मागणी दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु आता पाटणकरांनी आपल्या या मागणीसाठी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनाच सरकारी महापूजा करू न देण्याचा इशारा दिला. त्यामुळे हा वाद पुन्हा पेटला आहे. काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठलाची बडव्यांच्या विळख्यातून सुटका झाली. त्यानंतर कोणत्याही जाती-धर्माचा पुजारी नेमण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि आता विठ्ठल पूजेच्यावेळी म्हटले जाणारे ऋग्वेदातील जातीयवादी मंत्र बदलण्याच्या मागणीने जोर धरला आहे. हा सगळा प्रकार म्हणजे क्रांतिकारी घडामोडी आहेत. परंतु भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी पाटणकरांचे मंत्रोच्चार बदलण्याचे मत खोडून काढत विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी म्हणल्या जाणा-या पुरुषसुक्तात जातिव्यवस्थेबाबत कोणतेही चुकीचे मंत्र नाहीत. या मंत्रांचा चुकीचा अर्थ लावत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. ऋग्वेदात हे पुरुषसुक्त असून यात सर्वशक्तिमान परमेश्वराचे वर्णन केले आहे. यातील एका मंत्रात ब्राह्मण वर्ण मुखातून, क्षत्रिय वर्ण बाजूंमधून, वैश्य मांडीतून आणि शूद्र वर्ण पायातून उगम पावल्याचे वर्णन असल्याचे उत्पात यांनी सांगितले आहे. मात्र याचा व्यापक अर्थ घ्यायला हवा, असेही ते म्हणतात. चातुर्वण्र्यव्यवस्थेचे समर्थक असलेल्या उत्पातांकडून पुरुषसुक्त मंत्रांचे समर्थनच होणार हे अपेक्षितच आहे. जे पुरुषसुक्त मंत्र विठ्ठलाच्या पूजेच्यावेळी म्हटले जातात, ते धडधडीत जातीयवादी व्यवस्थेचे समर्थन करणारे आहेत. कारण वर्णव्यवस्थेचे मूळ ऋग्वेदातील दहाव्या मंडलात येणाèया पुरुषसुक्तात आहे आणि त्याचाच विस्तार पुढे ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्मृतीत झाला आहे हे सर्वमान्य मत आहे. या पुरुषसुक्तातील ११ व्या आणि १२ व्या ऋचेत काय म्हटले आहे, तर देवांनी जेव्हा पुरुषाचे असे विभाजन केले ते त्याचे तुकडे करून काय? त्याचे मस्तक काय होते? त्याचे हात काय होते? त्याच्या मांड्यांचे आणि पायांचे काय झाले?  तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शूद्र हे त्याच्या पायापासून उत्पन्न झाले. या जातीयवादाचे उगमस्थान असलेल्या या पुरुषसुक्तातील बाराव्या ऋचेची खिल्ली उडवून क्रांतिबा महात्मा
फुले यांनीही  विरोध केला होता. शिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही या पुरुषसुक्ताचे शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथात विद्वत्तापूर्ण विश्लेषण केलेले आहे. त्यांनी या पुरुषसुक्ताबद्दल आपला आक्षेप नोंदविलेला आहे. मात्र आज जातीयवादी व्यवस्थेच्या समर्थकांना विठ्ठल पूजेच्या वेळी म्हटले जाणारे जातीयवादी मंत्र बदलण्याचा वाद निरर्थक वाटत आहे. कारण त्यांना सनातनी, जातीयवादी व्यवस्था टिकवून ठेवायची आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की, जे जे चुकीचे आहे, आक्षेपार्ह आहे, अन्यायी आहे ते बदलले पाहिजे. हजारो वर्षांपासून इथल्या बहुजनांच्या मेंदूवर चुकीचे आणि स्वहिताचे लादलेले तत्त्वज्ञान झिडकारणे हे क्रांतिकारी, पुरोगामीपणाचे लक्षण आहे.


                                                                                             पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर



वैदिकांचा ‘ प्रताप ‘

काही वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल भागातील एका पत्रकाराने एका नक्षलवाद्याची मुलाखत घेतली होती. त्यामुळे या पत्रकाराला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली होती. आता तर  मोस्ट वॉण्टेड कुख्यात अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हफिज सईद याची वेद प्रताप वैदिक या ज्येष्ठ पत्रकाराने पाकिस्तानात जाऊन लाहोरमध्ये मुलाखत घेतली.
एवढेच नाही तर तेथील डॉन न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मग याबाबत सरकार आपले हात वर करून कातडीबचाव धोरण का अवलंबित आहे?  हा प्रश्न कोणाही सर्वसामान्य
माणसाला पडू शकतो. या वैदिक-सईद भेटीवरून सोमवारी आणि मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गोंधळ झाला. कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारला वैदिक-सईद भेटीबाबतचे स्पष्टीकरण मागितले. वैदिक आणि हफिज सईद यांच्यात काय चर्चा झाली ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूत म्हणून वैदिक यांनी हफिजची भेट घेतली काय ? भारतीय दूतावासाने ही भेट घडवून आणली का ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला संसदेत धारेवर धरले.  याच दहशतवादाच्या मुद्यावरून याआधीच्या संपुआ सरकारवर त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने जोरदार हल्ले चढविले होते. आता फक्त बाजू बदलली आहे. काँग्रेसचे महासचिव दिग्विजयqसग यांनी वैदिक-सईद भेटीचा संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी जोडत वैदिक यांनी सईदसोबत कोणती चर्चा केली हे देशातील जनतेला कळलेच पाहिजे. शिवाय वैदिक यांना अटक करावी, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र वैदिक आणि सईद भेटीशी सरकारचा काडीमात्र संबंध नसल्याचे सरकारतर्फे दोन्ही सभागृहांत सांगण्यात आले. सभागृहाबाहेरही भाजपचे नेते, मंत्री वैदिक आणि सईद भेटीचा सरकारशी काही संबंध नसून वैदिक यांनी व्यक्तिगतरीत्या स्वतंत्र पत्रकार म्हणून त्यांची भेट घेतली आहे. पत्रकार म्हणून त्यांना कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे. भेट घेणे हा देशद्रोह नाही.  पण काश्मीरला स्वतंत्र करण्यास हरकत नाही, हे वैदिक यांचे विधान कोणी मान्य करणार नाही, अशा प्रतिक्रिया भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातून व्यक्त केल्या जात आहेत. परंतु पाकिस्तानातील ज्या ‘डॉनङ्क न्यूज चॅनलच्या पत्रकाराने वैदिक यांची मुलाखत घेतली त्या इफ्तिखार शिराजी यांनीच सांगितले की, भारतीय पत्रकार वैदिक जर व्यक्तिगतरीत्या सईदच्या
मुलाखतीसाठी आले असते तर येथील भारतीय दूतावासाने त्यांचे एवढे आदरातिथ्य कसे काय केले? शिवाय वैदिक यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेटही घेतली. तसेच ‘डॉनङ्क न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आहोत, लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपसाठी आपण कॅम्पेन केल्याचेही सांगितले. या सगळ्या बाबींवरून वैदिक हे मोदींचे दूत म्हणून सईद याच्या भेटीला गेले नसतील कशावरून? त्यामुळे केंद्र सरकारने याचे स्पष्टीकरण दिलेच पाहिजे.  काँग्रेससह शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपानेही वैदिक-सईद भेटीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया दिली असून वैदिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यक्ती असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच भारतीय दूतावासाला वैदिक-हाफिज सईदच्या भेटीबद्दल माहिती होती की त्यांनीच ही भेट घडवून आणली, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विषयावरून संसदेतही चांगलेच पडसाद उमटत आहेत. काहीही असले तरी वैदिक आणि हफिज सईद यांच्या भेटीचे गौडबंगाल काय हे उघड झाले पाहिजे. या प्रकरणाचे राजकीय रहस्य असेल तर तेही स्पष्ट झाले पाहिजे. कारण हा विषय देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा  आणि गंभीर असा आहे.

                                                                                          पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Translate