Saturday, December 24, 2016

नवी उमेद

तृप्तीताई अंधारे ह्यांनी घेतलेले हे कौतुकास्पद निर्णय

 पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे ह्यांनी घेतलेले हे कौतुकास्पद निर्णय
सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि महापालिकेच्या शाळांकडे लोकांचा
पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. अशा शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण
मिळत नाही असा समज सर्वश्रूत झालेला दिसून येतो. शिवाय सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे कमीपणाचे, दरिद्रीपणाचे समजले जाते. त्यातूनच खाजगी शाळांकडे पालक-विद्यार्थी ह्यांचा कल वाढलेला दिसून येतो. पण लातूर पंचायतसमितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे यांनी हा जिल्हा परिषद शाळांबद्दलचा समज चुकीचा आणि खोटा असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.
शिक्षण क्षेत्रात सध्या जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे. खाजगी शिक्षण
संस्था, खाजगी शाळा मोठ मोठी जाहिरातबाजी करून, विविध प्रकारची अमिषे
दाखवून विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन
देतात. केवळ विद्यार्थ्यांच्या संख्याबळावर शाळेचे अस्तित्व टिकवून ठेवणे
 हाच एकमेव उद्देश बहुतांश खाजगी शाळांचा असतो. शिवाय कॉन्व्हेंट
संस्कृतीमुळे यात आणखीनच भर पडली आहे. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दारोदार
 फिरताना दिसतात. विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी वर्गतुकड्यांची संख्या
कमी होऊ नये म्हणून त्या परिसरात विद्यार्थ्यांची पळवा पळवी मोठ्या
प्रमाणात सुरू झालेली आहे
अशा परिस्थितीत लातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने एक अनोखा उपक्रम राबवून हायटेक शाळा आणि आनंददायी शिक्षण जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू केले. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे यांनी पुढाकार घेऊन या शाळांमध्ये विविध वैशिष्टयपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. एवढेच नाही तर या उपक्रमांची लातूर तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ मोठे होर्डींग्ज लावून जाहिरातही केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवतापूर्ण शिक्षणमिळत असून विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश आजच निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा पद्धतीने शाळा प्रवेशाची जाहीरात करणारी लातूर पंचायत समिती ही पहिलीच असावी.
‘केवळ करिअर नव्हे, माणूस घडविणाऱ्या आमच्या जिल्हा परिषद शाळा' असे या जाहिरातीचे शिर्षक आहे. तसेच व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास... प्रगत
शिक्षण हाच आमचा ध्यास, असा उल्लेख केला आहे. जिल्हा परिषदेंच्या
शाळांमध्ये सर्वांसाठी मोफत शिक्षण, मोफत पाठ्य पुस्तके व स्वाध्याय
पुस्तिका, सकस पोषण आहार, मोफत गणवेश, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती,
इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषय, संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, मोफत
आरोग्य तपासणी व सेवा, अनुभवी व समृद्ध शिक्षक वृंद, ई-लर्निंगद्वारे
शिक्षण आणि १०० टक्के गुणवतेची हमी, असे विविध सुविधा-सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाबद्दल लातूर पंचायत समितीचे पर्यायाने
गटशिक्षणाधिकारी तृप्तीताई अंधारे यांचे सर्वत्र कौतूक केले जात
आहे.त्यांचा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात चर्चेचा व कुतुहलाचा विषय बनला
आहे
                                                                                    - शिवाजी कांबळे

नवी उमेद

‘स्वाधार’मुळे अंध शिकले जगणं

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातलं बुधोडा गाव. येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या स्वाधार केंद्रानं अंधांना प्रशिक्षण देत तिथेच स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं केलं आहे. स्वाधारचं वेगळेपण म्हणजे अंधपणाचे भांडवल न करता सन्मानाने अर्थाजन करीत एकमेकांना आधार देत समूहजीवन जगतात. हरिश्चंद्र सुडे हे सर्वांचे पपा तर सविता सुडे या ममा. या दाम्पत्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून अंधांना आधार आणि स्वाभिमानही दिला. सविता यांचं मागच्या वर्षी निधन झालं. पण त्यामुळे खचून न जाता हरिश्चंद्र सुडे स्वाधार सांभाळत आहेत. राष्ट्र सेवा दल, यदुनाथ थत्ते आणि दादा गुजर यांच्या संस्कारात हरिश्चंद्र सुडे वाढले. 

निलंगा तालुक्यात अंधांसाठी सुरू केलेला प्रकल्प नंतर त्यांनी बुधोडा येथे आणला. १९८७ ते ८८ दरम्यान सुडे यांनी आठ -दहा झोपड्या उभारून अंध प्रशिक्षण व अर्थाजनासह पुनर्वसन कामाला सुरूवात केली. संस्थेत राहून प्रशिक्षण घ्यावे आणि कमवावे, हीच काय ती इथल्या प्रवेशासाठी अट. इथे २५ हातमाग यंत्र आहेत. त्यावर सुंदर अशा सतरंज्या, गालिचे, शाळेसाठी लागणाऱ्या आसनपट्टया तयार होऊ लागल्या आहेत. आता जुन्या साड्यांपासून अत्यंत सुंदर व कलात्मक गालीचे, सतरंज्या विणण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. लातूर शहरातील मिनी मार्केटमध्ये एका गाळ्यात विक्रीकेंद्रही उघडलं आहे.
यातून अंधांना महिन्याकाठी तीन-साडेतीन हजार रुपयांपर्यंतची मिळकत येते. शिवाय अंध व्यक्तींना अॅतक्युप्रेशर मसाज करण्याचं प्रशिक्षण देऊन मसाजसेंटर देखील सुरू केले आहे. अंध व्यक्ती अत्यंत कुशलतेने मसाज करतात. 
केंद्रात अंध स्त्री-पुरुषांना मोफत प्रवेश आहे. राहायची, भोजनाची सोय आणि रोजगारप्रशिक्षण दिलं जाते. तिथेच कामही मिळते. सुडे यांनी या ठिकाणी काम करणाऱ्यांचे आंतरजातीय विवाहदेखील लावून दिले आहेत. येथील अंधांना जगण्याचा आत्मविश्वास मिळाला की ते आपापल्या गावी परत जातात आणि सन्मानाने ताठ मानेने जीवन व्यतीत करतात.
सुडे म्हणतात, "स्पर्शज्ञानातून अंधांना स्वावलंबी बनविण्याचं काम करतो. त्यातून अनेक अंध उभे राहिले आहेत. गेल्या ३० वर्षांत हजारो अंध सन्मानजनक अर्थाजन करीत जगणं शिकले आहेत. आता मुलगा प्रशांत या कामात साथ देत आहे".

लेखक: शिवाजी कांबळे, लातूर.

Wednesday, December 7, 2016

नवी उमेद :


...त्याने दिली प्रेरणा


आम्ही सेवक’ या संस्थेच्या माध्यमातून रवी बापटले काम करीत होते. एकदा काही कारणाने ते उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथे गेले. तिथे घडलेल्या एका विचित्र घटनेने अस्वस्थ झाले आणि तिथंच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. गावात एक एचआयव्हीबाधित जोडपे होते. पदरी एक मुलगा. आजाराने मुलाची आई मरण पावली. नंतर या लहानशा मुलालाही एचआयव्हीचा असल्याचे समजले. तेव्हा कुटुंबीयांनी या मुलाला त्याच्या पित्यासह वाळीत टाकले. एका पडक्या खोलीत त्यांची रवानगी झाली. काही काळातच या मुलाचा अन्नपाण्यावाचून मृत्यू झाला. आजाराचा संसर्ग होईल या गैरसमजामुळे त्याच्या मृतदेहाकडे तब्बल तीन दिवस कोणीही लक्ष दिले नाही. हे पाहून बापटले यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने या मुलावर अंत्यसंस्कार केले. याच घटनेमुळे बापटले यांच्या मनात ‘सेवालया’चे बीज रूजले. 
हासेगाव ता. औसा जि. लातूर येथे रवी बापटले यांनी २००७ मध्ये सेवालय सुरू केले. सध्या या सेवालयात ७१ मुलं आहेत. त्यांच्या या कामाला समाजातून मोठा विरोध झाला. मात्र, त्यांनी खंबीरपणे उभे राहत सरकारी अनुदानाशिवाय हे केंद्र चालविले. स्वत: अविवाहित राहून हा प्रपंच त्यांनी व्यापक केला आहे. अशी अनेक लहान मुले त्यांनी न केलेल्या दोषाची शिक्षा भोगत असतील, अनाथ व बहिष्कृत होऊन जगत असतील या विचाराने एचआयव्हीबाधित मुलांसाठी सेवालयाची स्थापना केल्याचे ते सांगतात. 
बापटले यांनी हासेगावच्या माळरानावर नंदनवन फुलवले आहे. सेवालय उभारून ७१ मुलांचे आईबाप बनून ते संगोपन करीत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी, परदेशी फंड न घेता लोकांच्या दातृत्वावर हे सेवालय चालते. याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शांतेश्वर मुक्ता यांचे आजोबा कै. मन्मथ अप्पा मुक्ता यांनी सेवालयाला साडेसहा एकर जमीन दान केलेली आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी सेवालयाचे पालकत्व स्वीकारले आहे. 
शिकायला मिळणे हा प्रत्येक बालकाचा हक्कच. पण तो हक्कही इथल्या ग्रामसभेने डावलला होता. शेवटी लातूरमधील पत्रकार व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुलांच्या पाठीशी उभे राहत हसेगावच्या जिल्हापरिषद शाळेत या मुलांना प्रवेश देणे भाग पाडले.
आज एचआयव्हीबद्दलची दहशत काहीशी कमी झाली असली तरी एचआयव्हीबाधित व त्यांच्या मुलांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर या मुलांचे मोठे हाल होतात. अशा मुलांना येथे आधार दिला जातो, मायेने सांभाळले जाते, एवढेच नाही तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. 
 चिमुकली मुले लवकरच १८ वर्ष पूर्ण करणार आहेत. आता पुढे काय, या विचारातून अस्वस्थ झालेल्या बापटले यांच्या चिंतनातून ‘हॅप्पी इंडियन व्हिलेज’चा (एचआयव्ही) चा जन्म झाला. सज्ञान मुलांच्या पुनवर्सनाचा हा देशातील एकमेव प्रकल्प असावा. आर्थिक पायाबांधणीला हीच मुले पुढे सरसावली. स्नेहा शिंदे यांच्या सहकार्यातून मुलांनी 'हैप्पी म्युझिक शो' सुरु केला. आणि त्यातून होणाऱ्या अर्थप्राप्तीतून संस्थेचं बरचसं कामकाज चालतं. मायेचा पदर आणि बापटले यांच्या आश्वासक खांद्यांचा आधार घेऊन हे बाळगोपाळ वाटचाल करीत आहेत.

रवी बापटले यांचा मोबा. क्र. - ९५०३१७७७००

शिवाजी कांबळे - लातूर.

Translate