Saturday, August 10, 2013

माक्र्स आणि आंबेडकरवादाचे ‘फ्युजन'


..............................................................
 लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या उभ्या आयुष्यात जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा यांच्या सीमा तोडून दीन-दलितांसाठी त्यांनी आपली लेखणी झिजविली. दलित, पीडित, शोषित, बहिष्कृत, तिरस्कृत, कष्टकरी बहुजन समाजाच्या गुलामीचे, बंडाचे, जगण्याचे चित्रण अफलातून निर्माण केले. आज त्यांची जयंती. त्यांची जयंती कर्मकांड ठरू नये म्हणून त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच अण्णा भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल.
..........................................................
लोकशाहीर, साहित्यरत्न क्रांतिवीर  तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक लोकशाहीर, कथा-कादंबरीकार म्हणून परिचित असले तरी ते क्रांतिकारी विचारवंत, राष्ट्रनिर्माते होते.  मानवमुक्तीच्या लढ्यासाठी समाजपरिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाèया अण्णा भाऊंची मात्र जिवंतपणी आणि निर्वाणानंतरही उपेक्षा झाली असली तरी त्यांच्या विचारांची धग आजही समाजमनात कायम आहे पण आज आम्ही महापुरुषांची वाटणी करून घेतली असून त्यांच्या नावाखाली निरर्थक वाद निर्माण करून चळवळीचे तीनतेरा करीत आहोत. एकमेकांपासून दूर जात आहोत. तो मांग आहे, तो महार आहे, मातंग समाजातील अण्णा भाऊंचे समर्थक म्हणवून घेणारे आंबेकरवाद्यांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात तर काही आंबेडकरवादी मातंगांना हीन लेखतात. एवढेच नाही तर बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांमध्येही काही अंशी अशीच स्थिती आहे. त्यामुळेच परिवर्तनवादी बहुजनांच्या चळवळींची वाताहत झाली. आताशा तर पावसाळ्यातल्या छत्र्याप्रमाणे चळवळ गटा-गटांत विखुरलेली दिसून येत आहे.  काही ना-लायक नेत्यांनी जाती-पोटजातीचे सुरू केलेले राजकारण, समाजकारणच त्याला कारणीभूत आहे. तथागत गौतम बुद्ध, समतावादी लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची गुंफण एक आहे हे अद्यापही समाजमनात रुजलेच नाही.
      या थोर महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसवून त्यांना संकुचित करणे  हे वैचारिक दारिद््रय नाही तर काय? व्यक्तिपूजक बनण्यापेक्षा या महापुरुषांचे विचार आचरणात आणणे ही खरी काळाची गरज आहे. अण्णा भाऊ कम्युनिस्ट होते की आंबेडकरवादी होते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र चर्चा करणाèयांनी कितीही चर्चा केली तर ती निरर्थकच ठरेल यात शंका नाही. कारण अण्णा भाऊ माक्र्स आणि आंबेडकरवादाचे एक रसायन होते  हेच  चर्चेअंती स्पष्ट होईल.परवा नामवंत आंबेडकरी विचारवंत आणि नाटककार दत्ता भगत यांनी एका वृत्तपत्रातील लेखात आपणास माक्र्सबद्दल अपार आदर असल्याचे नमूद करीत माक्र्सवादाला विरोध करणाèया पोथीनिष्ठ आंबेडकरवाद्यांचा समाचार घेतला. भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीविरोधात माक्र्सचे विचार होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यांसमोर भारतातल्या जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीचे स्वरूप होते. अण्णा भाऊ  कम्युनिस्ट होतेच पण ते आंबेडकरवादी होते हे त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने जाणवते. कारण देशाच्या अधोगतीस जात हीच संकल्पना कारणीभूत आहे. जातीच्या गुलामगिरीतून बाहेर पडल्याखेरीज सामान्य लोकांची प्रगती होणार नाही.
    अण्णा भाऊंनी या जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला. जात, वर्ण, भेद यांच्या सीमा त्यांनी नाकारल्या.  अण्णा भाऊंनी शाहिरी, कथा-कादंबरी, तमाशाला  प्रतिष्ठा मिळवून दिली. याच कलांच्या माध्यमातून त्यांनी कष्टकरी जनतेत अन्याय-
अत्याचारांविरुद्ध जागृती आणली. सामाजिक न्यायासाठी ते आयुष्यभर झगडले. आपल्या साहित्यातून सत्याला महत्त्व दिले. अण्णा भाऊंनी क्रांतिqसह नाना पाटील यांचे रेठरे (बु.) च्या जत्रेतील तमाशाच्या फडात भाषण ऐकले. तेव्हा अण्णा भाऊ हे त्यांचे मावसभाऊ बापू साठे यांच्या तमाशा फडात काम करीत होते. तेव्हापासून अण्णा भाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा मिळाली. अण्णा भाऊंचे कुटुंब सांगलीहून मुंबईला आले आणि अण्णा भाऊ कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले. या काळात त्यांची वैचारिक जडणघडण झाली.  तद्नंतर ‘चले जावङ्क चळवळीत ते सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध वॉरंट निघाले आणि  अण्णा भाऊंना कायमचे घर सोडावे लागले. त्यानंतर अण्णांनी मुंबई गाठली आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. पक्षाच्या प्रचारासाठी १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटाङ्क  कलापथकाची स्थापना केली. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर होते. अण्णांचे लिखाण  मात्र अखंडपणे सुरूच होते. दरम्यानच्या काळात ते रशियाचा दौराही करून आले. अण्णा भाऊंचा लढा सर्वांना माहीत असलाच पाहिजे आणि हे गृहीतच आहे. अण्णा भाऊंची जयंती कर्मकांड ठरू नये. अण्णा भाऊंची समतावादी, मानवतावादी चळवळ पुढे नेण्यासाठी आपणांस अण्णा भाऊ थांबले त्यापुढचे पाऊल टाकायचे आहे. हा दृढ निर्धार अण्णा भाऊ आणि बाबासाहेबांच्या समर्थकांनी करण्याची खरी वेळ आहे. अण्णा भाऊ  साठे यांच्या जयंती- निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन !!!
             
                                                                                          -शिवाजी कांबळे
                                                                                                 ९०११३०८५८०

No comments:

Post a Comment

Translate