Wednesday, April 17, 2013

बाबासाहेब, आम्हाला माफ करा...



बाबासाहेब ! ज्यांना आपली सावली
सोबत घेऊन चालायची मुभा नव्हती,
अशांना तुम्ही त्यांची सावली दिलीत...अनिष्ट रुढी, परंपरांच्या नरकयातनांतून तुम्हीच मुक्ती दिलीत. अंधारात चाचपडणा-यांना तु
म्ही अत् दीप भव चा मंत्र दिलात. गावकुसाबाहेरचं उपेक्षेचं जिणं जगणा-यांना तुम्हीच माणसात आणलंत. मग  तुमची जयंती काय साधी होणार. मुळीच नाही. लोक विभूतीपूजा म्हणोत अथवा काहीही म्हणोत, जयंती जल्लोषातच साजरी झाली पाहिजे. जयंतीचा भीमसागर पाहून कुणाचा पोटसूळ उठत असल तर खुशाल उठू द्या. बाबासाहेब, तुमच्या जयंती निमित्ताने महिनाभर प्रबोधनाचे कार्यक्रम होतात हे का टीकाकारांना माहित नाही.  तुमची जयंती दरवर्षी मोठ्या जल्लोषात 
साजरी करतोत. घामाघूम होईपर्यंत जयंतीच्या
मिरवणुकीत अंगात वारं शिरल्यागत नाचत नी घोषणा देत. बाबासाहेब, तुमची जयंती आमच्यासाठी दिवाळी
असते...   पण बाबासाहेब, एकाच गोष्टीचं वाईट वाटतय, तुम्हाला आम्हीच नाही तर विरोधकांनीही  आता चलनी नाणं करुन टाकलयं. आताशा सगळेचजण आपल्या स्वार्थासाठी तुमचे नाव घेतायत...
 बाबासाहेब , तुमच्यासह महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवराय या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करुन जातीयतेचं विष पेरलं जातेय. शिवाय सगळ्याच पातळ्यांवर तुमचे कांही अनुयायी तडजोडीच्या मार्गातून पळवाटा शोधताना दिसत आहेत. बाबासाहेब, तुमच्यानंतर या चळवळीचा रथ पुढे नेणारा
कोणी माईचा लाल अजूनतरी जन्माला आला नाही.
तुमचा परिवर्तनाचा रथ  पुढे नेण्याऐवजी मागे नेण्याचाच प्रयत्न या ना त्या कारणावरुन केला जातोय. तुमचा जयंती उत्सव हा आंबेडकरी चळवळीचा भाग होण्याऐवजी पारंपारिक कर्मकांडाचा भाग होऊ नये, याची काळजी घेताना कोणी दिसत नाही. तुमच्या अनुयायांमध्ये एकी राहीली नाही, तर बेकी निर्माण झालीय. एकाच गावात,
एकाच गल्लीत तुमच्या जयंतीच्या अनेक राहुट्या दिसतात. गटा-तटांनी चळवळीला पोखरले आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील आमचाच खरा पक्ष म्हणून वेगवेगळे मांडव टाकून तुमची जयंती साजरी करताना दिसतात. जयंतीच्या मंचावरुन आक्रमक भाषणे केली जातात. सलग अठरा तासांच्या अभ्यासाची नाटकं जयंतीनिमित्त केली
जातात आणि वर्षभर त्यादृष्टीने काहीच केले जात नाही.  त्यातून निष्पन्नही काहीच होताना दिसत नाही. एवढेच नाही तर तुमच्या आणि चळवळीच्या नावावर वर्गणी जमा करुन त्यातून काय केले जात, याचा हिशोबही समाजाला दिला जात नाही. याचा अर्थ असा नाही की, सगळेच तसे आहेत, काही अनुयायी तुमच्या विचारांवर काटेकोरपणे चालण्याचा प्रयत्न करणारेही आहेत, पण  तुरळकच...  तुम्ही दलितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करुन दिला अन् तुमच्याच विचारांचा, तत्वांचा पराभव होण्याइतपत कांही दलित नेत्यांचे वर्तन होताना दिसते. नेत्यांमधील अहंकारामुळं कोणीच कोणाला गिनत नाही. मै बडा मै बडा, या नेते आणि कार्यकत्र्यांच्या प्रवृत्तीमुळे आंबेडकरी चळवळीचेच नुकसान होतेय. हे कोणी कोणाला सांगायचे?

Translate