Saturday, January 18, 2014

एका विद्रोहाची अखेर

अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा
शब्द हुंकारले
नरकाच्या कोंडवाड्यात
किती दिवस राहायचं आम्ही?
श्वास घुसमटत !
वा रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो
किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहायचं का असेच युद्धकैदी?
अशा कवितेतून  अभिजनवादी समाजव्यवस्थेला जाब विचारून हादरे देणारे बंडखोर, विद्रोही महाकवी, दलित पँथर चळवळीचे प्रणेते, विचारवंत पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे बुधवारी पहाटे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निर्वाण झाले आणि पँथर पर्वाचा अस्त झाला. एक धगधगता निखारा शांत झाला. त्यांच्या निधनाने दलित चळवळीचेच नाही तर देशातील तरूणांच्या सर्व चळवळींचे मोठे नुकसान झाले आहे.
मूलभूत भूमिका जगणारा आणि वंचितांचे जग कवितेच्या केंद्रस्थानी आणणारा ते महाकवी होते. नामेदेव ढसाळ हे नव्या पिढीचे, नव्या जाणिवांचे, समाजातील अंधारविश्व न्याहाळून त्यावर आपल्या भेदक शैलीतून जीवनावर  त्यांनी भाष्य केले. ते जसे संवेदनशील कवी होते, तसेच बंडखोर विचारांचे झुंजार सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांची अपारंपारिक, धीट, रांगडी आक्रमक शब्दकला साहित्यातील प्रस्थापित संकेतांना,रूढ संकल्पना छेद देत वाचकांच्या अंतकरणात भावनांचे कल्लोळ निर्माण करते. राजकीय प्रक्षोभक विचारांबरोबरच धगधगते सामाजिक वास्तव त्यांच्या साहित्यनिर्मितीचे मूलस्त्रोत
आहेत. त्यांची कविता ही सर्वस्वी त्यांची, त्यांच्या अस्सल अनुभुतीचा अविष्कार म्हणता येईल, सामाजिक परिवर्तनासाठी हत्यार म्हणून कवितेचा वापर करणारे ते एकमेवच. अत्यंत गरीबी आणि जातीयवादाशी
लहानपणापासून संघर्ष करावा लागलेल्या ढसाळ यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठे स्थान निर्माण केलेले आहे.  संत शिरोमणी तुकारामानंतर विद्रोही कवी म्हणून नामदेव ढसाळ यांचेच नाव घ्यावे लागेल. त्यांनी आपल्या साहित्यातून अभिजनवर्गाचा मोठा दंभस्फोट केला. त्यांनी आपल्या लिखाणातून क्रांतीकारी विचारांची पेरण केली. त्यामुळे त्यांच्या साहित्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. त्यांचे गोलपीठा, मूर्ख म्हताèयाने डोंगर हलविले, प्रियदर्शनी, आंबेडकरी चळवळ, तुही यत्ता कंची, गांडू बगीचा, सत्तेत जीव रमत नाही, तिचे बोट धरून  मी चाललो आहे, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे हे काव्यसंग्रह खूप गाजले. शिवाय आंधळे शतक, हाडकी हडवळ, सर्व काही समष्टीसाठी, बुद्ध धम्म काही शेषप्रश्न, उजेडाची काळी दुनिया या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कारही मिळालेले
आहेत.त्यांच्या साहित्याचे अनुदवार qहदी, इंग्रजी, फे्रंच, जर्मनी आणि उर्दू भाषेतही झाले आहेत. ढसाळ यांचे साहित्य अनुभवाच्या मुशीतून साकारलेले आहे. त्यांचा अनुभव माणुसकी आणि मानवतेला विदीर्ण करणारा होते. माणूस म्हणून हक्क प्रस्थापनेचा राजकीय संघर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केला होता. त्याच
मार्गावरून ढसाळ यांनी मार्गक्रमण केले. माणसे संपतात पण त्यांचे कर्तृत्व आणि लढे नुसतेच आठवणीत उरत नाहीत, तर इतिहासाची साक्ष काढून प्रेरणादायी ठरतात.  सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत एक झुंजार योद्धयासारखे नामदेव ढसाळ अखेरच्या श्वसापर्यंत लढत राहीले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणास्त्रोतातून त्यांच्या साहित्याचा उगम झालेला असल्यामुळे विश्वसाहित्यात  त्यांच्या साहित्याने मानाचा तूरा खोवला आहे. ढसाळ यांना राजकारणात कधीच रस नव्हता, तर रस्त्यावर उतरून शोषितांच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याचा त्यांचा पींड होता. दलितांवरील वाढत्या अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथरङ्क संघटनेपासून प्रेरणा घेऊन त्यांनी भारतात दलित पँथर या आक्रमक संघटनेची स्थापना केली. आणि राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकारणाला हादरे दिले. जिथे जिथे अन्याय, अत्याचार घडत होता तिथे तिथे रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्यांचे आयुष्य हे उघड्या पुस्तकासारखे होते. कसलाही आव न आणता वास्तव जीवन जगणारे ते कलंदर साहित्यिक,  एक सच्चा कार्यकर्ता, नेता होते. त्यांनी राजकारणात काहीही निर्णय घेतले असतील पण साहित्य प्रांतातील त्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे. नोबेल पुरस्काराची पात्रता असणारे नामदेव यांचे व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्व होते.
या महान व्याक्तिमत्वाची अखेरही अत्यंत वाईट अशी झाली. निस्वार्थी भावनेने, घरावर तुळशीपत्र ठेवून ढसाळ यांनी समाज परिवर्तनाच्या लढ्यात स्वत:ला झोकून दिले.शेवटी स्वत:च्या उपचारासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. दोन महिन्यापूर्वीच त्यांच्या उपचारासाठी रqवद्र नाट्यमंदिरात त्यांच्या कवितांवर कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यांची अर्धांगिनी मल्लिका अमर शेख यांनीही त्यांना वाघिणीसारखे पाठबळ दिले. त्यामुळेच त्यांचा प्रवास इथपर्यंत झाला.

No comments:

Post a Comment

Translate