Sunday, February 24, 2013

भाऊचा डबा



  नांदेड शहरात समाजसेवी ऎडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे - भाउचा डबा. शहरातल्या श्री गुरु गिविंदसिंघजी जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेणारे गरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना सकाळ संध्याकाळ दोन वेळा घरगुती जेवण मोफत पुरवणारा हा भाउचा डबा. चार वर्षात चाळीस हजार रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना जेवणाचे डबे पुरवण्यात आले आहेत. ही समाजसेवा अविरत सुरू आहे.
नांदेड शहरातलं श्री गुरु गिविंदसिंघजी जिल्हा सरकारी रुग्णालय. आवारातला हा संवाद - ‘बाबा, दोन दिस झालं...तुमी काहीच खाल्लं नाही. दोन घास खाऊन घ्या...अन माय, आज्ये तुमीही भाकरी खाऊन घ्या. मी बसते इथे पेशंटजवळ.‘ आणखी एक नातेवाईक म्हणत होता, ‘हो...जेवण केलं नाही तर तुमालाबी इथंच दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल.
 पण त्यांच्याकडे ना भाकरी ना हॉटेलचं खाणं खायला पैसा. त्यात मुलीच्या काळजीपायी तहानभूक उडालेली. स्टोव्हच्या भडक्यात भाजलेली त्यांची पोर रुग्णालयात मरणाशी झुंज देत होती. या अनोळखी नांदेड शहरात कुणी नातेवाईक नाहीत, मित्र नाहीत, आसरा नाही नि जवळचे पैसेही संपलेले. आणखी किती दिस काढायचे तेही माहीत नाही. आपलं गाव दूर राहिलेलं. आजीनं रुग्णालयाच्या आवारात चूल मांडून खिचडी शिजवण्याचा प्रयत्न करून पाहेला. पण कर्मचारी तिथे चूल पेटवायला परवानगी कशी देणार?
 असे प्रसंग तिथे रोजचेच झाले होते. शिवसेनेचे नगरसेवक ऎडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांना राहवलं नाही. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची ही परवड थांबण्यासाठी त्यांनी सुरुवातीला गरजूंना जेवणासाठी पैसे द्यायला सुरुवात केली. या छोट्या सुरुवातीतूनच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना जेवणाचे डबे पोचवण्याची कल्पना दिलीप ठाकूर यांना सुचली. नांदेडचे दिवंगत आमदार प्रकाशभाऊ खेडकर हे दिलीप ठाकुर यांचे गुरू. या प्रकाशभाऊंच्याच नावाने सुरू केलेला हा सेवाभावी उपक्रम भाऊचा डबा. या उपक्रमात ठाकूर यांना साथ आहे आमदार अनसुया खेडकर आणि नांदेड शहरातल्या गिरीश खियाणी, मुकेश्भाई ठक्कर, प्रदीप उंचलवार, राहुल बासटवार यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींची.
  ‘मागीतली भाकरी मिळाले चटके‘ अशा सध्याच्या वातावरणात भाऊचा डब्बा या अनुकरणीय उपक्रमाची दखल घ्यायलाच हवी. उपक्रम सुरू केला तेव्हा शहरातल्या काही सधन व्यक्तींनी सर्व खर्च द्यायची तयाती दाखवली होती. पण ठाकूर यांना उपक्रमात जास्तीत जास्त लोकसहभाग हवा होता. म्हणून त्यांनी वर्तमानपत्रातून आवाहन करून लोकांचा प्रतिसाद मिळवला. रुग्णालयाच्या प्रशासनानेही उपक्रमाला सहकार्यच दिलं. श्री गुरु गिविंदसिंघजी जिल्हा सरकारी रुग्णालयात येणार्‍या या डब्यांमध्ये घरगुती जेवण असतं. चपाती, भाजी आणि वरण भात हे रोज. आणि सणावारी पक्वान्न. डबा खाऊन रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तृप्त होतात. २००६ साली सुरू झालेल्या या उपक्रमात उत्स्फूर्त्पणे डबे देणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकदा ठाकूर हे डबे विकत घेण्यासाठी शहरातल्या अतुल लोटिया यांच्या भांड्यांच्या दुकानात गेले. लोटिया
  यांनी वर्षभर पुरतील इतके स्टीलचे डबे मोफत देऊन टाकले. दिलीप ठाकूर यांनी आपल्या कामातून मिळवलेल;या विश्वासार्हतेमुळे लोक त्यांच्या कामात स्वयंप्रेरणेने सामील होतात.आता या उपक्रमात १५०० नागरिक डबे (जेवण) देण्याचं काम करतात. सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी २५ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना हे डबे पुरवले जातात.
प्रत्येक वॉर्डातल्या नर्सच्या मदतीने रुग्णांची यादी तयार केली जाते आणि बाहेरचं खाणं परवडत नाही अशा गरीबांनाच डब्याचा लाभ मिळेल याची खातरजमाही केली जाते. डबे पुरवल्यानंतर दर दिवशी नर्सची सहीसुद्धा घेतली जाते. जेव्हा रुग्णांची संख्या जास्त असते तेव्हा शहरातले खाणावळवाले जास्तीचे डबे पुरवण्याची जबाबदारी उचलतात. रुग्णांचं जेवण झाल्यावर डबे धुवून पुन्हा वापरण्यासाठी गोळा केले जातात.
   चार वर्षात चाळीस हजार डबे पुरवण्यात आले आहेत. तीन स्वयंसेवक, त्यांचे गणवेश, त्यांच्यासाठी दुचाकी वाहानं, स्टिइलचे आणि प्लास्टिकचे डबे ही या उपक्रमासाठी लागणारी सामुग्रीही लोकांनी सामाजिक जाणिवेतून दिली आहे. हा उपक्रम कायमस्वरुपी सुरू राहावा यासाठी निधीसंकलन करून नियोजनबद्ध काम करण्याचा संकल्प केल्याचं ठाकूर सांगतात.
या उपक्रमाबद्दल गरिबांच्या मनात कोणत्या भावना आहेत हे या एका प्रसंगावरून कळतं. एकदा दिलीप ठाकूर हे माहूरला रेणुका माउलीच्या पदयात्रेला गेले होते. तिथे मंदिराच्या दरवाजाबाहेर फुलवालीकडून फुलं विकत घेण्यासाठी ते थांबले. फुलं विकणार्‍या बाईने त्यांना फुलं दिली. पण पैसे घेण्याचं मात्र नाकारलं. ती ठाकूर यांना म्हणाली, ‘सायेब, तुमी लई पुण्यवान माणसं हायती. माजी पोरगी आजारी असताना आमी नांदेडच्या दवाखान्यात आलो होतो. तिथं
 आमी तुमचा भाऊचा डबा खाल्ला होता. तुमी हजारोंच्या उपाशी पोटाला अन्न देता आणि मी तुमच्याकडून फुलासाठी पैसे घ्यावे का?‘
                                                                          
                                                                                                      ०००शिवाजी कांबळे०००

No comments:

Post a Comment

Translate