Wednesday, December 4, 2013

मतदार प्रगल्भ होतोय

पाच पैकी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये काँगे्रस आणि भारतीय जनता पक्षाने आपली संपूर्ण शक्ती आणि बुद्धी पणाला लावली असून  लोकांच्या मनात या निवडणुकीच्या निकालाबद्दल मोठी उत्सुकता  निर्माण झाली आहे, कारण या चार राज्यांमध्ये विक्रमी असे मतदान झाले आहे.  त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेचे पेव फुटले आहे. एवढे मतदान झाले कसे आणि हे मतदान कोणाच्या पारड्यात qकवा कोणाच्या विरोधात झाले, याचा अंदाज लावणे तितकेसे सोपे नाही. छत्तीसगडमध्ये
७५ टक्के, राजस्थान
७४ टक्के, मध्य प्रदेश ७१ टक्के आणि मिझोराममध्ये तब्बल ८० टक्के असे मतदान झाले आहे. त्यामुळे यावेळी झालेल्या विक्रमी मतदानाचा अर्थ काय, याचा शोध घेण्यात राजकीय अभ्यासक मश्गुल आहेत. जो-तो आपापल्यापरीने याचा अर्थ लावत असला तरी एक मात्र निश्चित की, आता मतदार शहाणा होत आहे, त्याच्यात जागृती होत आहे,  हेच या मतदानाच्या वाढत्या आकडेवारीवरून दिसून येते. आता दिल्लीमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान होईल अशी शक्यता आहे. छत्तीसगडसारख्या नक्षलग्रस्त राज्यातही मोठ्या प्रमाणात मतदान झाले. लोकांमध्ये राजकीयदृष्ट्या जागृती निर्माण झाली आहे. आपल्याकडे मतदानाबद्दल सर्वसाधारणपणे एक रूढ समज आहे की, मतदान जास्त झाले की ते सत्ताधाèयांच्या विरोधात असते, कारण लोकांची मानसिकता प्रस्थापितांच्या विरोधात असते. सरकारच्या विरोधात राग असतो तेव्हा सत्ताधाèयांना धडा शिकविण्यासाठी लोक आवर्जून मतदान करीत असतात. याचाच अर्थ असा की, जास्तीचे मतदान झाले की सत्तांतर होणार असा आडाखा बांधला जातो.  त्याप्रमाणे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे तिथे झालेल्या विक्रमी मतदानावरून तेथील भाजपची
सत्ता जाणार असा अंदाज काँग्रेसजनांनी व्यक्त केला आहे; परंतु अधिक मतदानाचा
अर्थ सत्तांतर असा घेतला तर राजस्थानमध्येही विक्रमी मतदान झाले आहे. मग  या राज्यातील काँग्रेसची सत्ता जाणार असाच अर्थ घ्यावा लागेल. याउलट राजस्थानचे
 मुख्यमंत्री अशोक गहलोत याचा अर्थ काँग्रेसचा एकतर्फी विजय होणार असा  काढत आहेत. जास्तीचे मतदान झाले की सत्तांतर निश्चित, हा फंडा राजकीय नेते आपल्या सोयीनुसार वापरत असतात. वास्तवात  मात्र निवडणुकांचे निकाल धक्कादायक येतात. भाजपने तर तिन्ही राज्यांत आपणच qजकू असा दावा केला आहे. तो कितपत सत्यात उतरतो हे पाहण्यासाठी घोडा मैदान दूर नाही.  जास्तीचे मतदान झाल्यास सत्तांतर होते, हे सूत्र गुजरातमध्ये फेल गेलेले आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये मतदानाचा टक्का वाढत गेला; पण तेथील सत्ताधारी
नरेंद्र मोदी कधीही पराभूत झाले नाहीत. उलट त्यांच्या जागा वाढत गेल्या. त्यामुळे
जास्तीचे मतदान झाले की सत्तांतर होतेच असे काही ठामपणे म्हणता येणार नाही. जास्तीचे झालेले मतदान हे सत्ताधाèयांच्या की विरोधकांच्या पारड्यात जाणार,  याचा अंदाज राजकीय अभ्यासक लावत आहेत. चार राज्यांत झालेले
 हे विक्रमी मतदान वीस ते तीस वर्षे वयोगटातील महिला आणि तरुणाईचे आहे. हे मतदान केद्र सरकारने वाढविलेल्या महागाई, भ्रष्टाचारविरोधातील आहे की त्या-त्या राज्यातील स्थानिक प्रश्नांवर झालेले आहे  हे  येत्या ८ डिसेंबरलाच स्पष्ट होईल; परंतु या पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल हा आगामी लोकसभा निवडणुकीची नांदी ठरणार आहे. यावरून २०१४ च्या लोकसभेचे चित्र स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे या पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालाला महत्त्व आलेले आहे.  मतदान केंद्रावरील युवा मतदारांच्या वाढत्या रांगांवरच देशाचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे मतदानाची वाढती टक्केवारी विचारप्रवर्तक अशी आहे.
     
                                            000 पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

No comments:

Post a Comment

Translate