Tuesday, January 7, 2014

डॉक्टरांची बेपर्वाई


अधिकाराचा दुरुपयोग, हलगर्जीपणा आणि त्यातून उद्भवणारे वाद असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे दिसून येते. परंतु अशा वादातून
संप qकवा बंद पुकारल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत असतात. याचे कोणालाही सोयरसुतक नसते. सोलापुरातही असाच  संतापजनक प्रकार घडला. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना  त्यांच्या हलगर्जीपणाबद्दल पोलिसांनी चांगलेच झोडपले आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. काय घडले या शासकीय रुग्णालयात, तर या रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे तिची प्रसूती रुग्णालयाच्या आवारातच झाली. निवासी डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या हलगर्जीपणामुळेच या महिला रुग्णावर ही स्थिती आल्याचा आरोप करीत तेथील उपस्थित तीन पोलिसांनी डॉक्टरांना मारहाण केली. सध्या मी एका अत्यवस्थ रुग्णाच्या सेवेत आहे, माझ्या सहकाèयाला सदर महिलेवर उपचार करण्यास सांगतो, असे सांगूनही पोलिसांनी डॉक्टरांना चोप दिला. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनीच डॉक्टरांना मारहाण केल्याने संतप्त झालेल्या सोलापूर आणि राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनीच या गंभीर घटनेची दखल घेतल्यानंतर संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टरांना संरक्षण देणारा कायदा अमलात आल्यानंतर या कायद्यानुसार तीन पोलिसांवर असा पहिला गुन्हा दाखल झाला आणि त्यांना निलंबितही केले आहे. मात्र या नव्या कायद्यानुसार हा गुन्हा दखलपात्र असतानाही तिघा पोलिसांवर मात्र अदखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले. याचा अर्थ पोलिसांनाच या कायद्याची माहिती अपुरी असल्याचे दिसून येते. पोलिसांनी डॉक्टरांना मारहाण करणे चुकीचेच आहे. डॉक्टरांनाच नाही तर सर्वसामान्य
व्यक्तींना पोलिसांनी मारहाण करणे qकवा त्यांची छळवणूक करणे योग्य नाही. पण आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळावा म्हणून राज्यभरातील गोरगरीब रुग्णांना वेठीस धरणे हे कितपत योग्य आहे? या घटनेनंतर  राज्यातील ४ हजार निवासी डॉक्टर संपावर गेल्याने सर्व जिल्हा रुग्णालयातील हजारो रुग्णांचे प्रचंड हाल झाले. याला जबाबदार कोण आहे? डॉक्टरांनी आपल्या समस्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, आंदोलन करावे, तसा त्यांना अधिकारही आहे; परंतु त्यामुळे रुग्णांची हेळसांड होणार नाही याची काळजी घेणेही मानवतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील बहुतांश शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांकडून रुग्णांना तत्परतेने सेवा मिळत नाही, शिवाय रुग्णांना सर्व औषधे बाहेरून आणण्यास सांगून त्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक केल्याच्या सार्वत्रिक तक्रारी
आहेत. बहुतांश सरकारी डॉक्टरांनी खासगी रुग्णालये थाटून आपली दुकानदारी सुरू केली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात गरीब रुग्णांना आवश्यक ती आरोग्य सेवा मिळत नाही हे वास्तव असले तरी दुसरीकडे सरकारने डॉक्टरांच्या समस्याही जाणून घ्यायला हव्यात. अनेक रुग्णालयांत पुरेसे वैद्यकीय अधिकारी नाहीत.
आहेत त्यांना निवासाची चांगली सोय नाही. अत्याधुनिक यंत्रणा बसविलेली असली तरी  तज्ज्ञांच्या अभावी ही यंत्रणा अनेक ठिकाणी धूळखात पडलेली दिसते. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात येणाèयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे डॉक्टरांवर ताण पडतो हेही तेवढेच खरे आहे. पण सोलापूर येथील प्रकरणावरून डॉक्टर्स, पोलिस आणि सरकार यांच्यामुळे असंख्य रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्याने पोलिसांना राग अनावर झाल्याचे बोलले जात आहे; पण पोलिस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेलेल्या गोरगरीब आणि सामान्य जनतेशी बहुतांश पोलिस कसे वागत असतात  हे सर्वश्रुत आहे. मात्र हा झाला प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्हच आहे.

                                                                                       पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

No comments:

Post a Comment

Translate