Tuesday, January 14, 2014

उपेक्षा महानतेची


आजपर्यंत अनेक कर्तृत्ववान, महान व्यक्तिमत्त्वांची समाजाने आणि सरकारनेही मोठी फरफट केल्याची अनेक उदाहरणे
आहेत. लोकही काळाच्या ओघात या महानतेला विसरून
जातात. अशाच  प्रकारची उपेक्षा स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या वाट्याला आली. जिवंतपणी तर त्यांच्यावर अन्याय झालाच पण मरणोत्तर सरकारी पातळीवर त्यांचा यथोचित गौरव  झाला नाही. ज्या काळात खेळांना कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन नव्हते, अत्यंत तोकड्या क्रीडा सुविधा असताना, त्या काळात   १९५२ च्या हेलqसकी ऑलिम्पिकमध्ये एखाद्या भारतीयाने कांस्य पदक पटकाविणे सोपी गोष्ट नव्हती. पण कुस्तीपटू खाशाबांनी स्वातंत्र्योत्तर काळात देशाला पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले. त्यामुळे देशाच्या शिरपेचात पहिला मानाचा तुरा खोवला गेला. आज १५ जानेवारीला त्यांची ८८ वी जयंती. यापूर्वीही खाशाबा यांच्या उपेक्षेबद्दल प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला होता, विविध  टीव्ही चॅनल्सनी  खाशाबांचा सन्मान झाला पाहिजे याबद्दल सरकारला जाणीव करून दिली. तेव्हा कुठे सरकारला जाग आली आणि बरीचशी आश्वासने दिली गेली. पण सरकारी पातळीवर खाशाबांची दखलच घेण्यात आली नाही.  त्यांना सातत्याने दुर्लक्षितच ठेवले गेले. भारताकडून सर्व वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेत्यांना पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. खाशाबा यांचे १९८४ साली निधन झाले आणि ते या पुरस्कारापासून वंचित राहिले. पद्म पुरस्कार न मिळालेले ते एकमेव आहेत. सरकारच्या नियमाप्रमाणे पद्म पुरस्कार मरणोत्तर दिले जात नाहीत.  तसे पाहिले तर गृहखात्याच्या या नियमाचा विचार केल्यास खाशाबांना कधीही हा पुरस्कार जाहीर होऊ शकत नाही; पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यासाठी पुरस्काराचे निकष बदलण्यात आले, त्याप्रमाणेच पद्म पुरस्कारासाठीही निकष बदलण्याची अपेक्षा खुद्द खाशाबा यांचे चिरंजीव रणजित जाधव यांनी व्यक्त केली. त्यांची ही अपेक्षा अगदी रास्तच आहे. खाशाबा जाधव यांना २००९
मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला; पण त्यासाठीही अनेक प्रयत्न करावे लागले.असे रणजित सांगतात. आपले हे प्रयत्न केवळ पुरस्कारासाठी नाहीत तर आपल्या वडिलांच्या कर्तृत्वाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आहेत. त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे, तो दूर करण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे ते सांगतात. त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही पत्र लिहून आपल्या वडिलांना न्याय देण्याची मागणी केली; पण नियम पुढे करून त्यांची विनंती धुडकावून लावण्यात आली. पुन्हा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार qशदे यांना पत्राद्वारे विनंती केली. त्यांच्या सूचनेनुसार रणजित यांनी पद्म पुरस्कारासाठी अर्जही केला; पण सरकारने पुन्हा नियमाचे घोडे पुढे करून नकारात्मक उत्तर देण्यात आले.  असे जरी असले तरी एखाद्या पात्र व्यक्तीस सरकार २६ जानेवारी (प्रजासत्ताकदिन)पूर्वी मरणोत्तर पुरस्कार जाहीर करू शकते. परवा बातमी आली की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर होऊ शकतो, कारण राज्य सरकारने जारी केलेल्या संभाव्य यादीत दाभोलकरांचे नाव अग्रभागी असल्याचे समजते. दाभोलकरांचे अंधश्रद्धा निर्मूलनातील अतुलनीय कार्य पाहून त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार दिला जात असेल तर ते चांगलेच आहे; पण भारतीय कुस्तीला मानदंड देणाèया खाशाबा जाधव यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष का? खाशाबा जाधवांवरच अन्याय का? असे प्रश्न साहजिकच मनात निर्माण होतात. मध्यंतरी भारतरत्न पुरस्कारावरून वादळ निर्माण झाले. हे वादळ शमते न शमते तोच पद्म पुरस्कारावर आता खल सुरू झाला आहे. हे सगळे वाद पाहता क्रीडा पुरस्कारासाठी केंद्र सरकारने नवे दिशानिर्देशही दिले आहेत; परंतु त्यामध्येही या पद्म पुरस्काराचा खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता सरकार  खाशाबा जाधव यांच्याबद्दल काय भूमिका घेते, हे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच स्पष्ट होईल.

                                                                                              पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

No comments:

Post a Comment

Translate