Tuesday, October 29, 2013

दया नावाचे वादळ शमले

 सध्याच्या काळात सर्वच पुरोगामी चळीवळी थंडावल्या आहेत, चळवळ संपली आहे, असे जे म्हटले जाते ते  सद्यस्थितीतील चळवळींवर एक दृष्टीक्षेप टाकला की, पटायला लागते. सामाजिक कार्यात झोकून देणा-या, घरावर तुळशीपत्र ठेवून चळीवळीसाठी आयुष्य अपर्ण करणा-
या कार्यकर्ते आताशा शोधूनही सापडणार नाहीत. सत्तर ते एेंशीच्या दशकांमध्ये दलित पँथरने अन्याय, अत्याचाराविरूद्ध जो लढा पुकारला होता, त्यास  तमामचळवळींच्या इतिहासात तोड नाही. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा अस्मितेचा लढा बनला. या १७ वर्षांच्या दीर्घ लढ्यात अनेकांचे बळी गेले. अनेकांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतली. हा लढा केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी नव्हता तर समता आणि अस्मितेसाठीचा होता. दलित पँथर आणि नामांतरचा काळ अनेक चांगल्या वाईट घटनांनी खच्चून भरलेला आहे. अनेक कार्यकत्र्यांनी वादळाशी झुंज घेतली. यातूनच अनेक चळवळी उभ्या राहिल्या, नेतृत्व निर्माण झाले. कवी, साहित्यिक तयार झाले. त्यापैकीच दया हिवराळे एक विद्रोही कवी, चित्रकार आणि निष्ठावंत कार्यकर्ता होते. मातंग समाजात जन्मलेले व बौद्ध धम्म स्वीकारलेले दया हिवराळे यांनी चळवळीसाठी वैचारिक आदर्श घालून दिला. ते पँथरपासून रिपाइंचे कार्यकर्ते होते. त्यांचे नुकतेच मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. तर त्याआधी काही दिवसांपूर्वीच माजी आमदार टी.एम. कांबळे यांचे लातूरमध्ये निधन झाले. दोन पँथर आपल्यातून निघुन गेले. हा आंबेडकरी चळवळीसाठी एक धक्काच आहे. पण नव्या पीढीला त्यांच्या कार्याचा विसर न पडता त्यांच्या चळवळीतील योगदानापासून आदर्श घ्यायला हवा, अशी ही माणसे होती. दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि.पवार नंतर दुसèया फळीतील कायकर्ते म्हणजे रामदास आठवले, दया हिवराळे, टी.एम. कांबळे, उमाकांत रणधीर, मनोहर अंकुश, गौतम सोनवणे, मराठवाड्यातील प्रीतमकुमार शेगावकर, एस.एम. प्रधान, रामराव गवळी, बाबुराव कदम, रतन पांडागळे यांनी पँथर चळवळ जिवंत ठेवली. दया हिवराळे  यांनी अमरावतीच्या चित्रकला महाविद्यालयातून एटीडीची पदवी घेतली आणि पँथर ते रिपाइं पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते सन २००२ पर्यंत राहीले. ते रिपाइंचे राज्यसचिवही होते. त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविलेला आहे. शिवाय ते पंधरा वर्षे कलाशिक्षकही होते. शासनाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रबोधनात्मक व्याख्याने दिली. विविध वृत्तपत्रातून क्रांतीप्रवण असे विपूल लेखन केलेले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज,  अण्णा भाऊ साठे , संत कबीर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना प्रमाण मानून त्यांनी अखंड चळवळ केली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर १९८३ साली मोठे आंदोलन झाले, त्यात दया हिवराळे यांना तुरुंगवास झाला. त्यांना ठाण्याच्या तुरुंगात पंधरा दिवस ठेवण्यात आले होेते. त्यांचा ‘आभारङ्क हा कवितासंग्रह चांगलाच गाजला. दया केवळ कवीच नव्हते तर ते एक सामाजिक मन होते. त्यांनी त्यांच्या कवितांमधून अन्यायाविरूद्धचा विद्रोह मांडला. एवढेच नाही तर नामांतर लढ्यात युद्धातील जवानासारखी झुंज दिलेल्या आणि सध्याच्या काळात अंधारात जीवन व्यतित करणाèया कार्यकत्र्यांचा त्याग, योगदान सगळे काळाच्या उदरात लूप्त होऊ पाहत आहे, त्यामुळे हिवराळे यांनी २००८ मध्ये वर्षभर घर सोडून महाराष्ट्रभर भटकंती करून अनंत अडचणींना सामोरे जात कार्यकत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातूनच ‘नामांतर लढ्यातील लढवय्येङ्क हा ग्रंथ साकारला. नामांतर लढ्यात बौद्धांनी नेतृत्व केले असले तरी यात मातंगासह सर्व  बहुजनांचा सहभाग होता. हे त्यांनी स्पष्ट केले.  इतरांच्या कार्याची दखल घेणाèया दया हिवराळे यांची दखल घ्यावी  आणि नव्या पीढीने त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून सामजिक चळवळीत झोकून दिले पाहिजे यासाठीच हा लेखनप्रपंच.
                                                     
                                            पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

No comments:

Post a Comment

Translate