Thursday, March 21, 2013

आसाराम बापूंची बेबंद धुळवड



पूर वा दुष्काळासारखे समाजावरील कोणतेही संकट असो, अशावेळी ज्यांचे हृदय पिळवटून निघते, जे समाजासाठी धावून येतात, मानसिक आधार देतात शिवाय समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करीत चांगल्या मार्गावर चालण्याचा संदेश देतात तेच खरे संत अशी आपली सर्वांची धारणा असते. पण आसाराम बापू सारख्या स्वयंघोषित वादग्रस्त अशा हायटेक साधुकडे पाहीले की, संत शिरोमणि तुकाराम महाराजांच्या  भोंदू साधुंवरील अभंगाची  आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज  एका  अभंगात म्हणतात-
ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनि म्हणती साधु
 अंगा लावूनिया राख,  डोळे झाकून करती पाप
 दावूनि वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा
तुका म्हणे सांगू किती, जळो तयाची संगती.
 तुकाराम महाराजांनी पाखंडी साधुंबद्दल केलेले वर्णन आसाराम बापूंना तंतोतंत लागू होते. सतत वादाच्या भोव-यात राहणा-या आसाराम बापू ने आपली वर्तवणूक आणि वक्तव्यावरुन पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावेळी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती भीषण असताना, आसाराम बापूंनी नाशिकनंतर नागपूर आणि नवी मुंबईत लाखो लिटर पाण्याची नासाडी करुन होळी साजरी  केल्याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया घालविताना या बापूंना थोडाही संकोच वाटत नाही हे विशेष. अशा लोकांना साधू कसे म्हणायचे हा प्रश्नच आहे. हे बापू तर साधुच्या वेषातील भोगी आहेत. आसाराम बापू आेिण त्यांचे शिष्य नगरपलिकांकडून पाणी मागवून होळी खेळत आहेत. इतकेच नाही तर त्यांना या पापाची जाणीव करुन दिलेलीही आवडत नाही. म्हणून त्यांना त्याची जाणीव करुन देणाèया पत्रकारांवर हल्ले करीत आहेत. होळी  आठ दिवसांवर असतानाच आसाराम बापूंनी महाराष्ट्रात होळीचे रंग उधळून दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. एवढेच नाही तर या साधुने ते खेळत असलेल्या होळीचे उद्धटपणे समर्थनही केले आहे. बापूंच्या शिष्यांना तर बापूंसोबत होळी खेळली की आपल्या आयुष्याचे कायमचे कल्याण होईल, असेच वाटते.  साधु बापूंनी होळी खेळण्याचे नवे तंत्र शोधून काढले आहे. ते व्यासपीठावर उभे असतात आणि हातात हायप्रेशरने हजारो लीटर पाणी एकदम उडविण्याची क्षमता असलेला पंप असतो. या पंपाद्वारे ते समोर जमलेल्या आपल्या भक्तांवर रंगीत पाण्याचे फवारे उडवतात आणि यातून त्यांच्या भक्तांना फार मोठे पुण्य मिळाल्यासारखे वाटते. पण असे करताना लाखो लिटर पाणी वाया जाते, याचे भान ना बापूंना ना त्यांच्या भक्तांना. अशी होळी त्यांनी नागपुरातील कस्तुरचंद पार्कच्या मैदानात आणि नवी मुंबईतील एरोली भागात बेजबाबदार आणि बेबंद धुळवड साजरी केली. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने होरपळत आहे, हे त्यांच्या गावीही नव्हते. विशेष म्हणजे भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेने बापूंच्या या धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरविले होते. आसाराम बापूंच्या या बेजबाबदार कृतीचा अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही निषेध केला आहे. मुंबईतही  नवी मुंबई मनपाने आसाराम यांच्या धुळवडीला पाणी देण्यास नकार दिल्याने बापूंच्या शिष्यांनी पत्रकारांवर जबर हल्ले केले. त्यात अनेक पत्रकार जखमी झाले. एवढे होऊनही आसारामभक्तांनी ठाण्याहून पाणी आणून धुळवड साजरी केलीच. हा निर्लज्जपणाचा कळस नव्हे तर काय? पाणी वाया घालविल्याचा या संत म्हणणाèया महाभागाला जरासुद्धा पश्चाताप नाही. उलट आपण काही चूकीचे केले नाही, प्रसारमाध्यमे  आपल्याविरुद्ध अपप्रचार करीत आहेत आणि आपण यापूढेही ठरल्याप्रमाणे धुळवड साजरी करु, असे उद्धटपणे जाहीर केले. आसाराम यांच्या धुळवडीवर संतप्त भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने आसाराम बापूंच्या होळी कार्यक्रमांवर बंदी घातली खरी पण ती जुमानतील ते बापू कुठले? त्याच्या विपरित वागण्यामुळे अनेकवेळा  त्यांच्यावर टीकेची झोडही उठलेली आहे. यापूर्वी बापूंनी भक्ताला लाथ मारल्याचे प्रकरण चांगलेच गाजले, शिवाय त्यांच्या आश्रमात घडलेल्या काही संशयास्पद मृत्यूंमुळे त्यांच्या भोवती आणि त्यांच्या आश्रमाभोवती संशयाचे धुके निर्माण झालेले आहेच. तसेच दिल्लीत बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कारासंदर्भातही त्यांनी या बलात्काराला ती तरुणीच जबाबदार असल्याचे संतापजनक वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. वृत्तपत्रांनीही बापूंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला होता. पण त्यानंतर बापू म्हणाले, वृत्तपत्रे ही कुत्रीच आहेत, ती भुंकणारच, तर अशा प्रकारच्या विचित्र साधुचे संयम, विवेकqकवा सामाजिक भान याच्याशी कोणतेही नाते नसल्याचेच दिसून येते. अशा आसाराम बापूंना पाणीटंचाई आणि पाणीबचतीचे भान राहीलेले नाही. सद्या महाराष्ट्रात पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावा-गावातल्या विहीरी, कुपनलिका, नद्या-नाले आटले आहेत. राज्यातील धरणांत अवघा ३७ टक्केच पाणी उरले आहे. पाण्याच्या संकटाला तोंड कसे द्यायचे, हीच qचता राज्यकर्ते, प्रशासन आणि लोकांना लागून राहीली आहे. अशा संकटकालिन स्थितीत कोणी लाखो लिटर पाणी वाया घालवित असेल तर लोक गप्प बसतील कसे ? पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचा अपव्यय करणाèयाविरुद्ध एनएमसी पाणी कायदा कलम ३० (१/सी) अन्वये कारवाई केली जाऊ शकते दोषी व्यक्तीची नळ जोेडणी कायमची तोडण्याची तरतूदही या कायद्यात आहे. या कायद्यानुसार आसाराम आणि त्यांच्या शिष्यांविरुद्ध  सरकारने करायला हवी. ही लोकांची रास्त अपेक्षा आहे. कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करुन दोषींना मोकळे सोडले जाईल, पण आगामी काळात  निर्माण होणाèया भीषण टंचाईचे काय, अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी  अशा कार्यक्रमांवर देशभर बंदी आणली पाहीजे. अशा आसाराम बापूंसारख्या ढोंगी साधु-बाबांमुळे जगभरात आपल्या देशाची खिल्ली उडवली जात आहे. उच्चशिक्षित लोक सुद्धा आसारामसारख्या ढोंगी साधुंच्या बहकाव्यात येऊ न कसे फसतात, याचेच आश्चर्य वाटते. लोकांनी सारासार विचार करुन श्रद्धेचा बाजार मांडणाèया अशा साधुंच्या नादी लागणे हे शिक्षण शिकूनही अडाणीपणाचेच आहे. सध्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना आसाराम सारख्या भोंदू बापूने अशा प्रकारे पाण्याची उधळपट्टी करणे, हे केवळ निषेधार्हच नाही तर qनद्य आहे. महाराष्ट्रातील जनता आसाराम बापूंच्या या लिला कदापी सहन करणार नाही. पण आपला तो बाब्या आणि दुसèयाचे कार्टे असेही होऊ नये. कारण दैनंदिन जीवनात बहुतांश लोक पाण्याचा अपव्यय करताना दिसतात.आपल्या महागड्या गाड्यांवर बसलेली धूळ पुसण्यासाठी पाईपमधून पाण्याचे फवारे उडवणारे, बंगला धुण्यासाठी शेकडो लिटर पाण्याचा वापर करणारे, टाकी ओव्हर फ्लो होत असतानाही तासाभरानंतर बंद करणारे, रोजच्या रोज गॅलरीत पाणी ओतणारे, उन्हाळ्यात गच्ची तापते आणि त्यामुळे उकडते, असे कारण देत संध्याकाळी गच्चीवर पाणी मारणारे असे अनेक आसाराम आपल्या शेजारीही आहेत. कधी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तर कधी निषेधाचा सूर काढून गप्प बसतो. अशा लोकांनाही  चाप लावण्याची गरज आहे.

                                                                           -- शिवाजी कांबळे, लातूर
                                                                                  ९०११३०८५८०

No comments:

Post a Comment

Translate