Wednesday, March 13, 2013

निखा-यासारखं व्यक्तिमत्त्व




--------------------------------
आयुष्यात यशस्वी होण्याची ज्यांची इच्छा असते  आणि ज्यांना स्वत:मध्ये काही बदल करायचे असतात, ज्यांना नव्या जगात झेपायचे असते, त्यांच्या आयुष्याचे शंभर नंबरी सोने होते. त्यासाठी अपार कष्टाचे, स्वतावरील विश्वासाचे बळ असावे लागते. तसे बळ असलेले, प्रतिकुल परिस्थितीवर स्वार होऊन यशस्वी वाटचाल करणारे लातूरचे पोलिस अधीक्षक बी.जी गायकर या व्यक्तिमत्वाबद्दल...
------------------------------
आईवडीलांचे संस्कार आणि परिश्रमामुळच माझं आयुष्य घडत गेलं. शेतात गुरा-ढोरांमागं जाऊन आणि वस्तीगृहात राहून शिक्षण  घेतलं. शिक्षणानचं माझ्यात बदल झाला. तुम्हीही  जिद्दीन ंशिक्षण घ्या, असं लातूरचे पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर हे सानेगुरुजी शाळेच्या  वार्षिक स्नेहसंमेलनात तळमळीने सांगत होते. समोर बसलेले विद्यार्थी-पालक त्यांचे भाषण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. या मंचावरच गायकर आणि माझी पहिल्यांदाच भेट झाली. त्यानंतर आवर्जून त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या संवादातून त्यांचे निखा-यासारखे तत्त्वनिष्ठ असणारे व्यक्तिमत्त्व उलगडत गेले. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ते पुढे आले. बी. जी. गायकर अर्थात बाळशिराम गणपत गायकर हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिराचीवाडी या लहानशा खेडयातले. आई-वडील निरक्षर, शेतीव्यावसाय करुन     कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. गायकर यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण वाडीतच झाले. तर सातवीपर्यंतचे शिक्षण ब्राम्हणवाड्यात तर दहावीपर्यंतचे शिक्षण ओतूरच्या संत गाडगे महाराज आश्रमशाळेत झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी संगमनेरला  गरीबांसाठी असलेल्या वस्तीगृहात राहुन पूर्ण केले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी पडेल ती कामे केली. वस्तीृहात सरपण फोडणे, दळण आणणे, हाताने स्वयंपाक करणे, भाजीपाला आणणे, झाडलोट करणे, अशी कामे करावी लागत. भूगोल विषयात ७४ टक्के गुण मिळवूनही कुठे नोकरी लागत नव्हती, म्हूणन गावाकडे जाऊन घरची जनावरे राखायचे काम केले. दरम्यानच्या काळात गावातीलच विकास सोसायटीत त्यांनी महिनाभर नोकरी केली. पण तिथे न पटणा-या गोष्टी घडत होत्या म्हूणून ती नोकरी सोडून दिली. मनात शिक्षणाचा ध्यास असल्याने आणि स्वत:चे आस्तिव निर्माण करण्याच्या जिद्दीने त्यांनी पुणे गाठले. पुण्यात राहायची सोय नव्हती, परंतु विज्ञान शाखेचे विभागप्रमुख डॉ. शिरगुरकर यांनी त्यांना मदत केली. पण या मदतीच्या मोबदल्यात त्यांनी गायकर याच्याकडून लेखी लिहून घेतले की, मी खूप अभ्यास करीत आणि विद्यापीठात पहिला येईल म्हणून. त्यानंतर त्यांची राहायची सोय झाली. कसेबसे  एस.पी. महाविद्यालयात एम.ए.ला अ‍ॅडमिश मिळाले. देना बँकेत काम करुन आणि महाविद्यालयात गरीब विद्याथ्र्यांसाठीचा निधीतून मदत मिळाल्याने शिक्षणासाठी आधार मिळाला.त्यांनी एमएला विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवला. डॉ. शिरगुरकर यांची प्रेरणा हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉर्इंट ठरला. तुम्ही जेव्हा मोठे अधिकारी व्हाल, तेव्हा तुमच्या सारखे गरीब तुमच्याकडे मदतीसाठी येतील, त्यावेळी तुम्ही त्यांना मदत करावी, म्हणूनच मी लेखी घेतले होते, असे शिरगुरसरांनी नंतर स्पष्ट केले. हे सांगताना गायकर भावूक झाले. एम.ए. नंतर गायकर यांनी रुरल डेव्हलपमेंट प्लॅqनगचा कोर्स केला. आर्थिक चणचण कायम होती. त्यामुळे विद्यापीठात जेवण स्वस्तात मिळायचे म्हणून तीन किमीवरुन तिथे यायचे. दरम्यानच्या काळात एनडीएमध्ये दोन वर्षे गायकर यांनी लेक्चरशिप केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. स्वत:च टीपण काढणे, सराव करणे, इंग्रजी भाषेवर कमांड मिळविले. टॉपिकवरुन विविध लेखकांची पुस्तके घेतली. खूप पुस्तके रेफर केली. शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. तास न् तास ग्रंथालयात बसायचो. भूगोल, इतिहास, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी विषयाची तयारी केली. परीक्षेत कमी वेळात जास्तीत जास्त मांडता आले पाहिजे, त्यासाठी खूप अभ्यास केला. त्यामुळेच एमपीएससीमध्ये यश मिळाले. असे गायकर सांगतात. बीडीओ म्हणून नगरला जॉईन झाले. ते स्पर्धा परीक्षा सतत देत राहीले. त्यांना उपजिल्हाधिकारी होण्याची आकांक्षा होती. पण त्यावेळी डीवायएसपी पदालाही क्रेझ होती. १९८४ मध्ये त्यांची ठाणे ग्रामीणचे डीवायएसपी  म्हणून निवड झाली. त्यानंतर पनवेल, अंबाजोगाई नंतर सीटीएसडीपीओ म्हणून १९९५-९६ ला लातूरला सेवा केली. पुणे लाचलूचपत प्रतिबंधक खात्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून कर्तव्य बजावले. पुन्हा लातूरला अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून १९९८ ला रुजू झाले. नाशिक, भंडारा येथे पोलिस अधिक्षकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर २०११ पासून ते लातूरचे पोलिस अधिक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत. ते आजच्या युवकांना सांगतात, अभ्यासाची सवय, परिस्थितीवर मात करण्याची तयारी, शिवाय डिव्होशन, जिद्द असल्यास यश निश्तिच मिळते.
                                                                                ---- शिवाजी कांबळे,
                                                                                      लातूर
                                                                                   ९०११३०८५८०







No comments:

Post a Comment

Translate