Wednesday, January 2, 2013

विद्येची खरी देवता

                                                  


                                           आपल्या सर्वांची खरी आई, विद्येची खरी देवता 
                                         क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना विनम्र अभिवादन !


आज ३ जानेवारी सावित्रीमाईंची जयंती. त्यानिमित्ताने सावित्रीमाईंचे जीवनकार्य इथं सांगणं म्हणजे केवह उपचार ठरेल. माईंचे कार्य, जीवन सर्वांना माहित असलेच पाहिजे. ते गृहीतच आहे. असे म्हणतात संत ज्ञानेश्वरांनी भींत चालवली, पण चार भींतीचे घर स्त्री एकटी चालवते. त्याचं काय? स्त्रीला जगत जननी म्हणून संबोधले जातं. जिल्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, स्त्री-पुरुष समानता आली पाहिजे, असा डीढोरा आज सर्वत्र पिटला जातो. सरकार, विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्तेही मोठा आव आणत स्त्री स्वातंत्र्याच्या आणि महिला अत्याचार विरोधी तास न तास बौद्धिक गप्पा मारत असतात. पण अलिकडे देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी या सगळ्या बुद्धिवाद्यांच्या थोबाडीत चपराक मारली आहे. सद्या आपल्या भारत देशात महिला अत्याचार, बलात्काराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडत नव्हते असे नाही, पण आता या प्रकरणांना वाचा फुटते आहे. सावित्रीमाईच्या लेकींवरील अत्याचारानं कळस गाठलाय. ज्या काळात स्त्रीयांना भोगवस्तू म्हणून संबोधलं जाई, स्त्री स्वातंत्र्याची भाषा करणं, तिनं शिक्षण घेणंही पाप समजलं जाई. अशा काळात सावित्रीमाईंनी मुलींना शिक्षणाचे दारे खुली करुन दिली. सावित्रीमाई भारतातील आद्य स्त्री शिक्षिका ठरल्या. शिक्षणासारखे अत्यंत पवित्र कार्य करणा-या सावित्रीमाइंचा आदर्श, राष्ट्रमाता जिजाऊंचा, रमाइंमातेचा आदर्श आपल्या सर्व तरुणाईसमोर असताना देशातील महिला-मुलींवर अत्याचार होतात. ही बाब देशाच्या दृष्ठीने अत्यंत लाजीरवाणी आहे. भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला व्यक्ती म्हणून स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. परंतु धर्मशास्त्राने अनेक वर्षांपासून तिला भोगवस्तू, दासीचा दर्जा दिला आहे. त्याची चिकित्सा कोणी करायलाच तयार नाही. स्त्रीया आजही अनिष्ट रुढी,परंपरेच्या बळी ठरत आहेत. जोपर्यंत भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. समाजाची स्त्रीयांकडे पाहण्याची मानसिकता बदलत नाही. लोकशिक्षण होत नाही. तोपर्यंत परिवर्तनाची अपेक्षा करणं म्हणजे पालथ्या घडयावर पाणीच.
हे तर षडयंत्र.........
दुसरा मुद्दा म्हणजे दलित-बहुजनांचे अत्यंत महत्वाचे प्रतीक असणाèया दिवसीच काळा दिवस पाळला जात आहे. ६ डिसेंबर हाही काळा दिवस पाळण्यात येतो. संविधान दिवसी बहिष्काराचे आवाहन केले जाते आणि आता ३ जानेवारीला सावित्रीमाईंच्या जयंती दिनी काळा दिवस पाळण्याचे आवाहन. अखेर प्रत्येक वेळी विरोध, निषेध व्यक्त करण्यासाठी दलित, बहुजन नायकांच्या प्रतीकांनाच लक्ष्य का केले जाते ? हा संयोग कसा असू शकतो, हे तर विचारपूर्वक केलेले षडयंत्र वाटते.
                                                                         ...........शिवाजी कांबळे


No comments:

Post a Comment

Translate