Wednesday, July 16, 2014

विठ्ठलपूजेचा अर्थपूर्ण वाद

समतावादी लोकराजे, बहुजनांचे कैवारी राजर्षि शाहू महाराजांचे १८९९ मध्ये वेदोक्त-पुराणोक्त प्रकरण गाजले होते. शाहू महाराजांच्या स्नानाच्या वेळी नारायण शास्त्री हे शूद्रांसाठीचे पुराणोक्त मंत्र म्हणत होते, ही बाब राजाराम शास्त्री भागवत यांनी उजेडात आणली होती. शाहू महाराजांच्या क्षत्रियत्वाला  आमच्या लेखी कवडीची qकमत नाही, असे नारायण शास्त्रींनी म्हटले होते. हा वाद महाराष्ट्रात अनेक वर्षे सुरू होता. या वादामुळेच शाहू महाराजांनी ब्राह्मणांचा वर्णश्रेष्ठत्ववादी संकल्प
धुडकावला. त्यामुळेच त्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाले. आता असाच एक वाद सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. तो म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पूजेवेळी म्हटले जाणारे पुरुषसुक्त मंत्र हे जातीयवादी, चातुर्वण्र्यव्यवस्थेचे समर्थन करणारे असून ते बदलावेत आणि त्याऐवजी संत तुकारामांचे मंगल चरण आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हटले जावे, अशी मागणी विठ्ठल-रुक्मिणी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष भारत पाटणकरांनी केली. खरे तर ही मागणी दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु आता पाटणकरांनी आपल्या या मागणीसाठी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनाच सरकारी महापूजा करू न देण्याचा इशारा दिला. त्यामुळे हा वाद पुन्हा पेटला आहे. काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठलाची बडव्यांच्या विळख्यातून सुटका झाली. त्यानंतर कोणत्याही जाती-धर्माचा पुजारी नेमण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि आता विठ्ठल पूजेच्यावेळी म्हटले जाणारे ऋग्वेदातील जातीयवादी मंत्र बदलण्याच्या मागणीने जोर धरला आहे. हा सगळा प्रकार म्हणजे क्रांतिकारी घडामोडी आहेत. परंतु भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी पाटणकरांचे मंत्रोच्चार बदलण्याचे मत खोडून काढत विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी म्हणल्या जाणा-या पुरुषसुक्तात जातिव्यवस्थेबाबत कोणतेही चुकीचे मंत्र नाहीत. या मंत्रांचा चुकीचा अर्थ लावत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. ऋग्वेदात हे पुरुषसुक्त असून यात सर्वशक्तिमान परमेश्वराचे वर्णन केले आहे. यातील एका मंत्रात ब्राह्मण वर्ण मुखातून, क्षत्रिय वर्ण बाजूंमधून, वैश्य मांडीतून आणि शूद्र वर्ण पायातून उगम पावल्याचे वर्णन असल्याचे उत्पात यांनी सांगितले आहे. मात्र याचा व्यापक अर्थ घ्यायला हवा, असेही ते म्हणतात. चातुर्वण्र्यव्यवस्थेचे समर्थक असलेल्या उत्पातांकडून पुरुषसुक्त मंत्रांचे समर्थनच होणार हे अपेक्षितच आहे. जे पुरुषसुक्त मंत्र विठ्ठलाच्या पूजेच्यावेळी म्हटले जातात, ते धडधडीत जातीयवादी व्यवस्थेचे समर्थन करणारे आहेत. कारण वर्णव्यवस्थेचे मूळ ऋग्वेदातील दहाव्या मंडलात येणाèया पुरुषसुक्तात आहे आणि त्याचाच विस्तार पुढे ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्मृतीत झाला आहे हे सर्वमान्य मत आहे. या पुरुषसुक्तातील ११ व्या आणि १२ व्या ऋचेत काय म्हटले आहे, तर देवांनी जेव्हा पुरुषाचे असे विभाजन केले ते त्याचे तुकडे करून काय? त्याचे मस्तक काय होते? त्याचे हात काय होते? त्याच्या मांड्यांचे आणि पायांचे काय झाले?  तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शूद्र हे त्याच्या पायापासून उत्पन्न झाले. या जातीयवादाचे उगमस्थान असलेल्या या पुरुषसुक्तातील बाराव्या ऋचेची खिल्ली उडवून क्रांतिबा महात्मा
फुले यांनीही  विरोध केला होता. शिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही या पुरुषसुक्ताचे शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथात विद्वत्तापूर्ण विश्लेषण केलेले आहे. त्यांनी या पुरुषसुक्ताबद्दल आपला आक्षेप नोंदविलेला आहे. मात्र आज जातीयवादी व्यवस्थेच्या समर्थकांना विठ्ठल पूजेच्या वेळी म्हटले जाणारे जातीयवादी मंत्र बदलण्याचा वाद निरर्थक वाटत आहे. कारण त्यांना सनातनी, जातीयवादी व्यवस्था टिकवून ठेवायची आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की, जे जे चुकीचे आहे, आक्षेपार्ह आहे, अन्यायी आहे ते बदलले पाहिजे. हजारो वर्षांपासून इथल्या बहुजनांच्या मेंदूवर चुकीचे आणि स्वहिताचे लादलेले तत्त्वज्ञान झिडकारणे हे क्रांतिकारी, पुरोगामीपणाचे लक्षण आहे.


                                                                                             पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर



No comments:

Post a Comment

Translate