Tuesday, October 29, 2013

दया नावाचे वादळ शमले

 सध्याच्या काळात सर्वच पुरोगामी चळीवळी थंडावल्या आहेत, चळवळ संपली आहे, असे जे म्हटले जाते ते  सद्यस्थितीतील चळवळींवर एक दृष्टीक्षेप टाकला की, पटायला लागते. सामाजिक कार्यात झोकून देणा-या, घरावर तुळशीपत्र ठेवून चळीवळीसाठी आयुष्य अपर्ण करणा-
या कार्यकर्ते आताशा शोधूनही सापडणार नाहीत. सत्तर ते एेंशीच्या दशकांमध्ये दलित पँथरने अन्याय, अत्याचाराविरूद्ध जो लढा पुकारला होता, त्यास  तमामचळवळींच्या इतिहासात तोड नाही. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा अस्मितेचा लढा बनला. या १७ वर्षांच्या दीर्घ लढ्यात अनेकांचे बळी गेले. अनेकांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतली. हा लढा केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी नव्हता तर समता आणि अस्मितेसाठीचा होता. दलित पँथर आणि नामांतरचा काळ अनेक चांगल्या वाईट घटनांनी खच्चून भरलेला आहे. अनेक कार्यकत्र्यांनी वादळाशी झुंज घेतली. यातूनच अनेक चळवळी उभ्या राहिल्या, नेतृत्व निर्माण झाले. कवी, साहित्यिक तयार झाले. त्यापैकीच दया हिवराळे एक विद्रोही कवी, चित्रकार आणि निष्ठावंत कार्यकर्ता होते. मातंग समाजात जन्मलेले व बौद्ध धम्म स्वीकारलेले दया हिवराळे यांनी चळवळीसाठी वैचारिक आदर्श घालून दिला. ते पँथरपासून रिपाइंचे कार्यकर्ते होते. त्यांचे नुकतेच मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. तर त्याआधी काही दिवसांपूर्वीच माजी आमदार टी.एम. कांबळे यांचे लातूरमध्ये निधन झाले. दोन पँथर आपल्यातून निघुन गेले. हा आंबेडकरी चळवळीसाठी एक धक्काच आहे. पण नव्या पीढीला त्यांच्या कार्याचा विसर न पडता त्यांच्या चळवळीतील योगदानापासून आदर्श घ्यायला हवा, अशी ही माणसे होती. दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि.पवार नंतर दुसèया फळीतील कायकर्ते म्हणजे रामदास आठवले, दया हिवराळे, टी.एम. कांबळे, उमाकांत रणधीर, मनोहर अंकुश, गौतम सोनवणे, मराठवाड्यातील प्रीतमकुमार शेगावकर, एस.एम. प्रधान, रामराव गवळी, बाबुराव कदम, रतन पांडागळे यांनी पँथर चळवळ जिवंत ठेवली. दया हिवराळे  यांनी अमरावतीच्या चित्रकला महाविद्यालयातून एटीडीची पदवी घेतली आणि पँथर ते रिपाइं पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते सन २००२ पर्यंत राहीले. ते रिपाइंचे राज्यसचिवही होते. त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविलेला आहे. शिवाय ते पंधरा वर्षे कलाशिक्षकही होते. शासनाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रबोधनात्मक व्याख्याने दिली. विविध वृत्तपत्रातून क्रांतीप्रवण असे विपूल लेखन केलेले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज,  अण्णा भाऊ साठे , संत कबीर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना प्रमाण मानून त्यांनी अखंड चळवळ केली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर १९८३ साली मोठे आंदोलन झाले, त्यात दया हिवराळे यांना तुरुंगवास झाला. त्यांना ठाण्याच्या तुरुंगात पंधरा दिवस ठेवण्यात आले होेते. त्यांचा ‘आभारङ्क हा कवितासंग्रह चांगलाच गाजला. दया केवळ कवीच नव्हते तर ते एक सामाजिक मन होते. त्यांनी त्यांच्या कवितांमधून अन्यायाविरूद्धचा विद्रोह मांडला. एवढेच नाही तर नामांतर लढ्यात युद्धातील जवानासारखी झुंज दिलेल्या आणि सध्याच्या काळात अंधारात जीवन व्यतित करणाèया कार्यकत्र्यांचा त्याग, योगदान सगळे काळाच्या उदरात लूप्त होऊ पाहत आहे, त्यामुळे हिवराळे यांनी २००८ मध्ये वर्षभर घर सोडून महाराष्ट्रभर भटकंती करून अनंत अडचणींना सामोरे जात कार्यकत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातूनच ‘नामांतर लढ्यातील लढवय्येङ्क हा ग्रंथ साकारला. नामांतर लढ्यात बौद्धांनी नेतृत्व केले असले तरी यात मातंगासह सर्व  बहुजनांचा सहभाग होता. हे त्यांनी स्पष्ट केले.  इतरांच्या कार्याची दखल घेणाèया दया हिवराळे यांची दखल घ्यावी  आणि नव्या पीढीने त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून सामजिक चळवळीत झोकून दिले पाहिजे यासाठीच हा लेखनप्रपंच.
                                                     
                                            पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

Tuesday, October 22, 2013

स्वाहाकाराला अभय

सध्या राज्यात राजकीय पुढा-यांनी सहकारी साखर कारखान्यांची   केलेली विक्री आणि त्यातील भ्रष्टाचार यावरून वातावरण तापले आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या या व्यवहारात १० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी करून अनेक दिग्गजांच्या छातीत धास्ती निर्माण केली. मात्र या आरोपांची काही दिग्गजांनी खिल्ली उडवून आपले कोणीच वाकडे करू शकत नाही, अशी मिजासही दाखविली.  सहकारातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राज्यात असा खल सुरू  असताना  सहकारी संस्था या माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाहीत, असा निकाल गेल्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना दिला.
त्यामुळे सहकारी  संस्थांमधील लोकांचा अपवाद वगळता सर्वांच्याच चेह-
यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. कोणत्याही सहकारी संस्थेवर सरकारचे नियंत्रण आणि देखरेख असते, त्यामुळे सहकारी संस्थासुद्धा माहिती अधिकाराच्या कक्षेत आल्या पाहिजेत, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला होता; परंतु या निर्णयाविरोधात काही सहकारी संस्थाचालकांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. त्यांच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला.  एखाद्या संस्थेवर सरकारची देखरेख असेल तर ती सरकारी संस्था होत नाही त्यामुळे सरकारी संस्थांसाठी लागू असलेले नियम अशा ठिकाणी लागू होणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले. त्यामुळे सहकारी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला. परंतु  महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणा-या सहकारी संस्थांना माहिती अधिकाराचा कायदा लागू होत नसल्याने आता सहकारातील भ्रष्टाचाराला एका अर्थाने पाठबळच मिळाले आहे. एखाद्या सहकारी संस्थेत भ्रष्टाचार झाला आहे की नाही, हे आता समजू शकणार नाही. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिका-यांना आपले उखळ पांढरे करून घेण्याची आयतीच संधी मिळणार आहे. पारदर्शकतेसाठी सर्व सहकारी संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत असल्या पाहिजेत, अशी रास्त अपेक्षा बुद्धिजीवींकडून व्यक्त केली जात आहे.  माहितीच्या अधिकारामुळे सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येतात ही बाब जनतेच्या हिताच्या दृष्टीने चांगली आहे; परंतु ज्यांना
आपला भ्रष्टाचार उघड होईल अशी भीती असते, त्यांना हा माहितीचा अधिकार म्हणजे साडेसाती वाटतो. मध्यंतरी राजकीय पक्षांनाही हा कायदा लागू व्हावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता; परंतु सरकारने वटहुकूम काढून हा निर्णय रद्दबातल ठरविला आणि राजकीय पक्षांनी निःश्वास टाकला. त्यानंतर शिक्षणसंस्थांनाही माहितीचा अधिकार लागू करण्याबाबत वाद निर्माण झाला होता. त्यासाठी अनेक शिक्षणसम्राटांनी प्रयत्नही केले; परंतु शिक्षणसंस्थांना सरकारचे अनुदान मिळत असल्यामुळे त्या या कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकल्या नाहीत. सहकारी संस्था मात्र या कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत सुटल्या आहेत. त्यामुळे सहकारातील स्वाहाकाराला अभयच मिळाले आहे. काहींच्या मते माहिती अधिकाराचा गैरफायदा घेऊन विविध खात्यांतील अधिकारी-कर्मचा-यांना काही लोक ब्लॅकमेल करीत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र तिथेच धूर निघतो जिथे काही तरी जळत असते. त्याचे मूळही भ्रष्टाचारातच आहे. त्यामुळे माहिती अधिकाराचे शस्त्र जनहितासाठी आवश्यक आहे. सरकारी वा सहकारी संस्था या मुळात जनतेच्या पैशांवरच चालत असतात.त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध असलेच पाहिजेत.  सहकारातून समृद्धी साधताना काही मूठभर लोकांचीच समृद्धी का होते? महाराष्ट्रातील काही जिल्हा सहकारी बँकांची का वाट लागली ? अनेक सहकारी साखर कारखाने का बंद पडले ? यांची उत्तरे  आरटीआय मुक्तीचे समर्थन करणा-यांकडे आहेत का? त्यामुळे ‘सहकारी संस्था माहिती आधिकाराच्या कक्षेत नाहीत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने हर्षित झालेल्यांनीच नव्हे तर सर्वांनीच याचा गांभीर्याने विचार करण्याची खरी गरज आहे. 

Sunday, October 20, 2013

मतदान पोचपावतीवर चर्चा हवीच

भारतीय संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आपला प्रतिनिधी निवडण्याची आणि प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळू लागली,सत्तेच्या माध्यमातून समाजात अमुलाग्र बदल घडविता येतो. त्यामुळेच संवैधानिक हक्कांना महत्त्व आहे. परंतु नागरिकांच्या मतांवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी संधीसाधू बनू लागले  आहेत. सत्तेतील पदाचा गैरवापर करून स्वत:च्या तुंबड्या भरून धनदांडगे होऊ लागले आहेत. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा नितीचा वापर नेतेमंडळी करू लागली आहेत. हे चालाख, धूर्त राजकारणी मंडळी मतदानादरम्यान नागरिकांनी केलेल्या मतदानामध्येही घोटाळे करून आपली आमदारकी, खासदारकी कशी अबाधित राहील,याचा प्रयत्न करता
ना दिसतात. पूर्वीच्या बॅलेट पद्धतीच्या जागी मतदान यंत्र आले. मात्र या मतदान यंत्रातही तांत्रिकरित्या घोटाळा करून लोकांची सर्वाधिक मते आपणासच
कशी पडतील याची सोय करीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही अनेक ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले. प्रामुख्याने नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघात  आणि नाशिकमध्येही असा घोटाळा झाल्याच्या तक्रारी निवडणुक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. असा गंभीर प्रकार भोकर विधानसभा मतदारसंघात घडल्याची तक्रार माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मतदानासाठी जे मतदान यंत्र आणण्यात आले होते, त्या यंत्राचे प्रात्याक्षिक निवडणुक अधिका-यांनी घेतले तेव्हा सात उमेदवारांच्या नावासमोर मतदान यंत्रावरील बटन दाबण्यात आले, तेव्हा असे दिसून आले की, सात पैकी पाच मते  प्रस्थापित पक्षाच्या एकाच उमेदवाराला पडली होती. नंतर निवडणूक अधिका-यांनी यंत्र खराब झाल्याचे कारण पुढे करीत या प्रकारावर पडदा टाकण्यात आला. अर्धापूर मतदारसंघातही मतदान यंत्रात हाच धक्कादायक प्रकार आढळून आला. शिवसेना, भाजपने या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवडणुक आयोगासह राष्ट्रपतींना पत्र लिहिले गेले परंतु पाच वर्षे उलटूनही यावर काहीच कार्यवाही झाली नाही. असाच प्रकार नाशिकमध्येही घडला होता.  तिथे मनसेने तिनही जागांवर विजय मिळविला आणि दिग्गजांचा पराभव झाला. त्यामुळे अकरा उमेदवारांनी स्वत:च्या स्वाक्षरीने मतदान यंत्रात घोटाळा करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे केली गेली. पुढे त्याचे काहीच झाले नाही. मतदानयंत्रात हॅqकग आणि सेqटग कशा प्रकारे केली जाऊ शकते, याबाबत हैदराबाचे साफ्टवेअर इंजिनीयर हरिप्रसाद यांनी सप्रयोग सिद्ध करून दाखविले होते. एवढेच नाही तर सॅटेलाईटच्या माध्यमातूनही मतदानायंत्रात आवश्यक ते बदल करता येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. मतदान यंत्र घोटाळ्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेकांनी अपील केले होते. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला आदेश दिले की, प्रत्येक मतदान केंद्रावर यंत्रासोबत qप्रटर जोडून मतदाराने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले, त्याची पावती देण्याची सोय करावी. तो मतदान कोणाला केले, याचा पुरावा राहील. मतदान यंत्राच्या घोटाळ्याला यातून आळा बसेल, या हेतून सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिले. परंतु मतदान पोच पावतीमुळे मतदानादरम्यान देशात अराजकता निर्माण होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मतदार मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर पडल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे पुढारी मतदारांवर दबाव आणून, मतदान कोणाला केले, असे म्हणून मतदाराकडून मतदानाची पावती जबरदस्तीने पाहू शकतात. यातून वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. मतांसाठी गाव-शहरांमध्ये ज्वारी उचलणे, शपथा घेणे असे प्रकार आधीपासूनच सुरु आहेत. त्यात मतदान पोचपावतीमुळे राजकारण्यांचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे समाजात त्याचे काय दुष्परिणाम होतील, यावर सांगोपांग चर्चा होण्याची खरी गरज आहे.

Tuesday, October 8, 2013

आसारामची ग्रँडमस्ती

एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या जोधपूरच्या तुरुंगात असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसुमल थाऊमल सिरुमलानी ऊर्फ आसारामबापू आणि त्यांचे पुत्र नारायण साई यांच्या रासलीलांचा,  बुवाबाजीचा भांडाफोड झाला आहे. मात्र त्यांच्या या दुष्कृत्याने संपूर्ण देशाची जगभर बदनामी होत आहे. तेरा वर्षांपूर्वी गुजरात सरकारने भैरावती गावात सत्संगाच्या प्रचारासाठी दहा एकर जमीन दिली आणि तेथूनच आसारामच्या दुष्कृत्याची कर्मकथा खèया अर्थाने सुरू झाली. त्यानंतर आसारामने देशभर फिरून लाखो भक्त निर्माण केले. सत्संगाच्या नावाखाली करोडो रुपयांची माया जमा केली, बेकायदेशीर जमिनी बळकावल्या, त्यावर आश्रम काढले. देशात आणि देशाबाहेर आसारामचे चारशेपेक्षा अधिक आश्रम असून त्याची मालमत्ता एक लाख कोटींच्या घरात आहे. परंतु मागील पाच वर्षांपासून त्यांच्या या गोरखधंद्याला घरघर लागली. आसाराम यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणे, नरबळी देणे, पत्रकारांना धमकावणे, भक्तांची शारीरिक छळणूक करणे, लोकांना गंडवणे, जमिनी हडप करणे, धमकी देणे असे अनेक गुन्हे या तथाकथित  संताने केलेले आहेत. धर्माच्या नावावर आसारामने लूट चालविली होती. ते अल्पवयीन तरुणींचे लैंगिक आणि मानसिक शोषण करीत आलेले आहेत. त्यांच्या या दुष्कृत्यांनी देशातच नव्हे तर जगभर खळबळ उडाली असून धार्मिक श्रद्धाळूंच्या संत, महंतांवरील विश्वासाला मोठा तडा गेला आहे. साधुत्वालाच काळे फासले  गेले आहे.आता गुजरातच्या सुरतमधील दोन बहिणींनी आसाराम आणि त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी तसेच त्याचा मुलगा नारायण साई  यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण केल्याचा एफआयआर दाखल केल्याने पुन्हा खळबळ  उडाली. आसारामने मोठ्या बहिणीवर तर नारायण साईने लहान बहिणीवर बलात्कार केला होता. दहा वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र भीतीपोटी याची कोठेही वाच्यता केली नव्हती. या आणखी एका
तक्रारीमुळे आसारामचे कुटुंबच गोत्यात आले. एवढेच नाही तर अहमदाबाद येथील वीणा चौहान यांच्या कुटुंबियावर आसारामने विषप्रयोग करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेतून चौहान यांचे कुटुंबीय बचावले गेले. पाच वर्षांपूर्वी दांभोईमध्ये आसारामच्या आश्रमातील पीडित मुलींना मदत केल्यावरून वीणा चौहान व त्यांच्या कुटुंबीयांना आसारामने पाठविलेल्या तरुणीकडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आसारामने यापूर्वीही अनेक कुकर्म केलेली आहेत. जुलै २००८ मध्ये qछदवाडा येथील त्यांच्या आश्रमातील बाथरूममध्ये बालकाचा मृतदेह आढळून आला होता. भक्तांच्या छळवणुकीचेही अनेक प्रकार उघडकीस  आलेले आहेत. रामाची कथा सांगून रावणाची चाल खेळणारा आसाराम मात्र  त्याच्यावरील आरोपांना आपल्याविरुद्धचे षड्यंत्र असल्याचे सांगत आहे. तर त्यांचे समर्थकही धर्माचा आडपडदा घेऊन, आमच्या परम पूज्य आसाराम बापूंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, जे काही सिद्ध होईल, ते कोर्टात होईल, असा डांगोरा पिटत आहेत. मग आसाराम यांच्याविरुद्धच्या तक्रारी काय खोट्या आहेत? ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्ङ्क या उक्तीप्रमाणे लाखो लोकांनी आसारामवर विश्वास व्यक्त केला; परंतु आसारामची ही धर्मश्रद्धा नव्हे तर अंधश्रद्धा असल्याचे स्पष्ट होत असल्याने आता लोकांचे डोळे उघडू लागले आहेत. ज्यांच्या ज्यांच्यावर आसारामने अत्याचार केलेला आहे, अशा पीडितांना आसाराम तुरुंगात गेल्याने आत्मबळ मिळाले असून  ते तक्रार करण्यास धजावत आहेत.  आध्यात्मिकतेच्या बुरख्याखालून बुवाबाजीची ग्रँडमस्ती  करणाèया आसाराम  आणि त्यांचा मुलगा नारायण साईला तुरुंगात जीवनभर सडवायला हवे, जेणेकरून त्यानंतर कोणी बुवा, महाराज लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणार नाहीत qकवा श्रद्धाळू भाविकांचे शोषण करण्यास धजावणार नाहीत. देशातील  अशा इतरही ढोंगी, भोंदू  महाराजांना पायबंद घातला  जावा अन्यथा समाजात अराजकता माजण्यास वेळ लागणार नाही.

Wednesday, October 2, 2013

अस्वस्थ करणारी दिरंगाई

अंधाराच्या सनातनी दुतांनो, तुमच्या तथाकथित अध्यात्मिक शक्तिने
कणभरही मारता आलं नाही नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला,
अंतिमत: ....पराभूत होऊन तुम्हाला टेकावे लागले गुडघे,..
 म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं...
सचिन माळी नामक तरूणाने ऑर्थर रोड जेलमधून डॉ.नरेंद्र दाभोलकरांवर लिहिलेली ही कविता तमाम सनातन्यांसाठी एक मोठी चपराक आहे. एवढेच नाही तर पुरोगामीपणाचा टेंभा मिरविणाèया आणि तब्बल दीड महिना उलटून गेला तरी दाभोलकरांच्या मारेकèयांचा शोध लावू न शकलेल्या शासनकत्र्यांसाठी आत्मपरिक्षण करायला लावणारे हे स्पदंन आहे. दाभोलकरांचे मारेकरी अद्यापही मोकाटच असल्याने  महाराष्ट्रातील तमाम सुधारणावादी पुरोगामी कार्यकत्र्यांमध्ये अशी प्रचंड अस्वस्थता, एक धुमस् निर्माण झाली आहे. दाभोलकरांच्या हत्येला महिना पूर्ण झाल्यानंतर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकत्र्यांच्या आणि सहानुभूतीदारांच्या बैठका झाल्या. काही ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकाèयांना निवदने देऊन दाभोलकरांच्या हत्येची उकल करण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. पोलिस आणि शासनकर्ते आपल्या नेहमीच्या शैलीत शोध सुरु आहे, आमचे प्रयत्न सुरु आहेत, आम्ही आरोपींपर्यत पोहचत आहोत, काही माग सुद्धा लागलेला आहे, अशी उत्तरे देत आहेत. महिनाभरात केवळ दोन आरोपीचे स्केच, याच्या पलिकडे पोलिसांचा तपास गेलेला नाही. सीसीटीव्ही कॅमेèयावर हत्येत गुंतलेल्या आरोपींचे पुसटसे चित्रण लंडनच्या फॉरेन्सिक  लॅबोरेटरीकडे पाठविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.  हे चित्रण महिनाभरापूर्वीच लंडनला का पाठविण्यात आले नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात गुन्ह्यांचा शोध लावण्याच्या पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे कितीही गूढ गुन्हा असला तरी त्याचा शोध लावला जातोच. राज्यातील पोलिस शोध तंत्राचा वापर करण्यास सक्षम नाहीत, असेही नाही, पण दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत दिरंगाई का ? या दिरंगाईमुळेच समाजात अस्वस्थता आणि अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. दाभोलकरांच्या मारेकèयांचा शोध घेण्यास शासन आणि पोलिसांना अपयश येत असल्यामुळे दाभोलकरांच्या हत्येमागे शासनाशी संबंधित असलेल्या कोणाचा तरी हात आहे की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दाभोलकरांच्या संदर्भात अशा अनेक शंका कुजबुजल्या जात असून त्या चर्चेतही आल्या आहेत. या सगळ्या शंकांना  एकच उत्तर उपाय ठरू शकतो ते म्हणजे  शासनाने तात्काळ तपास करून मारेकèयांना कठोर शासन करणे. जर राज्य शासन आणि पोलिसांना तपास लावणे शक्य होत नसेल तर ते प्रकरण सीबीआयकडे द्यावे. जेणेकरून दाभोलकरांच्या हत्येचा पर्दाफाश होऊ शकेल.  मारेकèयांनी दाभोलकरांची हत्या करून परराज्यात पोबारा केला असावा, अशी काहींची शंका असल्याने तपास सीबीआयकडेच देणे पर्याप्त ठरू शकेल. दाभोलकरांचा खुनी शोधण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीचीही मदत घ्यावी, अशी अपेक्षा दाभोलकरांचे चिरंजिव, डॉ.हमीद दाभोलकर यांनी परवा लातूरला आल्यानंतर व्यक्त केली. दाभोलकरांचे कुटुंबही राज्याच्या पोलिस तपासावर विश्वास दर्शवित आहेत आणि पोलिसांना मात्र कसलेच धागेदोरे सापडत नाहीत. याचा अर्थ काय?  जादूटोणा विरोधी कायदा संमत व्हावा, यासाठी  दाभोलकरांचा बळी गेला. तो कायदा संमत व्हावा यासाठी राज्यासह केंद्रातील बड्या नेत्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी महाराष्ट्राने खंबीरपणे उभे राहण्याची खरी गरज आहे. नागपूरात होणाèया हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर झाला तर  तीच दाभोलकरांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल.

Saturday, August 10, 2013

मराठीतील पहिला अ‍ॅनिमेशनपट ‘छत्रपती शिवाजी '



लातूरकरांची ऐतिहासिक कलाकृती
.............................................
 लातूरचे चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अझहर खान आणि त्यांच्या टीमने ‘छत्रपती शिवाजीङ्क हा मराठीतील पहिला ऐतिहासिक अ‍ॅनिमेशनपट तयार  केला असून नुकताच हा अ‍ॅनिमेशनपट महाराष्ट्रात सर्वत्र रुपेरी पडद्यावर झळकला आहे. मनोरंजनाबरोबरच बालप्रेक्षकांना छत्रपतींचा इतिहास कळावा, या हेतून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाला बालकांसह पालक, शिक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाबद्दल घेतलेला हा आढावा...
....................................................
 मराठवाडा मागासलेला आहे, म्हणून या भागाला नेहमी हिणविलं जातं. परंतु वेळोवेळी मराठवाड्याने राजकारण, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली गुणवता सिद्ध करून अटकेपार झेंडा फडकावला आहे. विकासाकडे वाटचाल करणारे लातूर शहर तर यामध्ये आघाडीवर आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख हे चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच  बीपी (बालक-पालक) या  चित्रपटाची निर्मिती केली, त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. त्यानंतर पेशाने शिक्षक असलेले लातूरचे अझहर खान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर ‘छत्रपती शिवाजी : द एम्परर ऑफ पीपल्स प्राईडङ्क हा अ‍ॅनिमेशनपट तयार करून सिनेजगतात एक वादळ निर्माण केले आहे. मराठीतील हा पहिलाच अ‍ॅनिमेशनपट ठरला आहे. गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रात केवळ पाच चित्रपट तयार झाले आहेत. ही खूप खर्चिक अशी बाब आहे. त्यामुळे अ‍ॅनिमेशनपट काढण्याचे धाडस सहसा कोणी करीत नाही. मात्र, लातूरकरांनी हे धाडस करून इतिहास घडविला आहे. अझहर खान हे लातूरमध्ये मॉरेल मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम करतात. त्यांनी आपल्या अमन अनम प्रॉडक्शनद्वारे त्यांच्या संस्थेतील अ‍ॅनिमेशनचे शिक्षक आणि विद्याथ्र्यांच्या कौशल्याचे सहकार्य घेऊन या ऐतिहासिक अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती केली. अझहर खान यांनी छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास मांडला आहे. छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. एक आदर्श जाणता राजा म्हणून त्यांची ओळख भारत खंडात आहे. त्यांचा इतिहास आजपर्यंत कथा, कादंबèया आणि इतिहासाच्या पुस्तकातून मांडण्यात आला. काही बोटांवर मोजण्याइतपत चित्रपटही निघाले. मात्र, आतापर्यंत त्यांच्या चरित्रावर अ‍ॅनिमेशनपट कुणी तयार केला नव्हता. अ‍ॅनिमेशन qकवा कार्टून म्हटले की, लहान मुलांना लवकर आकर्षित करणारे माध्यम आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांची शौर्य कथा विद्याथ्र्यांसमोर मांडावी आणि मनोरंजनातून त्यांचे प्रबोधन व्हावे, कारण ज्यांना आपला इतिहास माहित असतो, तेच इतिहास घडवू शकतात, या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली असून, याचा निश्चितच विद्याथ्र्यांच्या जडणघडणीवर काहीअंशी चांगला परिणाम होईल, यात शंका नाही, असा विश्वास या अ‍ॅनिमेशनपटाचे निर्माते, दिग्दर्शक अजहर खान यांनी दैनिक एकमतशी बोलताना व्यक्त केला.
‘छत्रपती शिवाजीङ्क हा अ‍ॅनिमेशनपट बाल प्रेक्षकांसाठी जेवढा उद्बोधक आहे, तेवढाच मनोरंजक आणि वीररसाने परिपूर्ण असा चित्रपट आहे. मराठीसह qहदी, तामिळी, तेलुगू आणि इंग्रजी अशा पाच भाषांत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही खान यांचेच आहेत. त्यांना जगमोहन कपूर, कार्तिकेय तिवारी आनंदqसग आदी नामवंत तज्ज्ञांनी सहकार्य केले आहे. या चित्रपटाला राम गौतम व कार्तिकेय तिवारी यांनी अप्रतिम असे संगीत दिले आहे. चित्रपटात सहा गाणी असून सुप्रसिद्ध गायक कैलास खेर, अमेय दाते, संजीवनी, जावेद अली, साधना सरगम आणि मधुश्री यांनी गायिली आहेत. त्यांच्या या गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. या चित्रपटाची पूर्णपणे डिजीटल टेक्नॉलॉजी आहे. या अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग जर्मनीहून करून आणली आहे. अतिशय महागड्या तंत्रज्ञांनाचा वापर करून चित्रपट आकर्षक आणि प्रभावी तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी राज्यात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी शासनाने हा चित्रपट टॅक्स फ्री केला. त्यामुळे  या चित्रपटाने गेल्या आठवड्यात ९६ टक्के व्यवसाय मिळविला आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो, असेही खान यांनी सांगितले. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूरमध्ये पीव्हीआर आणि बिग सिनेमा या थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी झुंबड उडालेली दिसून येत आहे. पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न या प्रमुख शहरांतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 या चित्रपटाच्या निर्मितीचे मोठे आव्हान होते. तथापि, लातूरकरांवर अपार प्रेम करून सर्वांनाच प्रोत्साहन देणारे आमचे प्रेरणास्थान माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी प्रारंभी मदतीचा हात आणि प्रेरणा दिल्याने चार वर्षांच्या अथक परिश्रमातून हे कार्य पूर्ण केले. या ऐतिहासिक कार्यामागे साहेबांचीच खरी प्रेरणा आहे. त्यामुळे हा अ‍ॅनिमेशनपट त्यांनाच समर्पित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
   यात शिवरायांच्या जन्मापूर्वीचा काळ, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती, शिवरायांचा जन्म, बालपण ते शिवराज्याभिषेक असे प्रसंग घेतले असून, यामध्ये एकूण वेगवेगळे ५६ प्रसंग चितारले आहेत. यामध्ये सलग ११ लाख चित्र आहेत. चित्रपटातील रिमिक्सही खरोखरच अफलातून  आहे.
या चित्रपटाची कथा लिहिताना कोणताही वाद ओढवून घेतलेला नाही. शासनाला जो छत्रपती शिवरायांचा इतिहास मान्य आहे, तोच इतिहास चितारण्यात आला आहे. शिवरायांचे कृषी धोरण, सीमा सुरक्षा, समुद्रीतट असे विविध विषयही हाताळले आहेत. अ‍ॅनिमेशन हे बालमनोरंजनाचे उत्तम साधन असल्याने  आणि मुले शौर्यप्रिय असल्याने त्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास कळावा, हा या चित्रपटाचा हेतू असल्याचा पुनरुच्चार अझहर खान यांनी केला. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर द मॅन ऑफ सेंच्युरी या नावाने अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होईल. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा संकल्प असल्याचे निर्माता-दिग्दर्शक अजहर खान यांनी सांगितले.
बॉक्स..............
  या अ‍ॅनिमेशनपटाची वैशिष्टये
 *छत्रपती शिवाजी महाराजांवरील जगातला पहिला अ‍ॅनिमेशनपट.
* विद्याथ्र्यांनी विद्याथ्र्यांसाठी तयार करण्यात आलेला पहिलाच चित्रपट.
*लातूरसारख्या ग्रामीण भागातील शिक्षक, विद्याथ्र्यांची अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानामध्ये गरुडझेप.
*मराठीतील सर्वांत बिग बजेट चित्रपट.
*१३ चित्रपट चॅनलनी कव्हरस्टोरी बनविली.
*एकूण पाच भाषा मराठी, तेलुगू, इंग्रजी, तामिळ आणि qहदी भाषातून एकाचवेळी प्रदर्शित होणारा चित्रपट.
 लोकनेते विलासराव देशमुख यांना समर्पित !
छत्रपती शिवरायांप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख  साहेबांनीही महाराष्ट्रात एक आदर्श राज्य करून दाखविले. ‘छत्रपती शिवाजीङ्क या अ‍ॅनिमेशनपटाला साहेबांचीच खरी प्रेरणा आहे. साहेबांनीच प्रोत्साहन आणि मदतीचा हात दिला म्हणूनच या चित्रपटाचा प्रकल्प पूर्ण होऊ  शकला. साहेबांच्याच हस्ते या चित्रपटातील गाणी १९ फेब्रुवारी २०११ रोजी लॉन्चिग करण्यात आली. साहेबांच्याच संस्कारात वाढलो, मोठा झालो. वडिलांनी मला जन्म दिला आणि साहेबांनी मोठे केले. त्यामुळे हा अ‍ॅनिमेशनपट साहेबांनाच समर्पित केला आहे. शिवाय या चित्रपटासाठी आमदार अमित देशमुख आणि सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनीही वेळोवेळी हातभार लावला. त्यांचेही आभार मानतो, असे निर्माता-दिग्दर्शक अझहर खान यांनी भावूकपणे सांगितले.
लातूरकरांची भरारी सातासमुद्रापार...
शिवरायांवरील अ‍ॅनिमेशनपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्येही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या माध्यमातून लातूरकरांनी सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. त्यातच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर द मॅन ऑफ सेंच्युरी या नावाने अ‍ॅनिमेशनपट तयार करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीत हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होईल. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा संकल्प असल्याचेही निर्माता-दिग्दर्शक अजहर खान यांनी सांगितले. या माध्यमातूनही ते मोठी झेप घेऊ शकतात.
रितेश देशमुख यांच्या हस्ते प्रोमोचा शुभारंभ
६ जानेवारी २०१३ रोजी मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजीङ्क या अ‍ॅनिमेशनपटाचा प्रोमो सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी रितेश देशमुख यांनी लातूरचे दिग्दर्शक, निर्मात्यासह सर्व कलावंताचे कौतुक करून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. निर्माता अझहर खान व त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांचे आभार मानले.
अ‍ॅनिमेशनची ‘एबीसीडीङ्क माहित नसलेला दिग्दर्शक
‘छत्रपती शिवाजीङ्क या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे अझहर खान हे जरी महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ  फॅशन अ‍ॅण्ड इंटेरिअर आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य असले तरी त्यांना चार वर्षांपूर्वी अ‍ॅनिमेशनची साधी एबीसीडी सुद्धा माहित नव्हती. परंतु त्यांनी आपल्या महाविद्यालयातील अ‍ॅनिमेशनच्या शिक्षकांकडून ते कौशल्य अवगत करून घेतले. आपण तज्ज्ञ नसलो तर त्याबाबत जाणकार मात्र आहोत, असे ते सांगतात.
चित्रपटाची रेंडरिंग जर्मनीत
 या अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग ही जर्मनीतून करून आणली आहे. कारण अ‍ॅनिमेशनपटाची रेंडरिंग म्हणजे जे चित्र असतात, त्यांना उत्कृष्टरित्या पॉलिश करण्याचे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान भारतात केवळ मुंबईत आणि त्यानंतर स्वित्झर्र्लंंड आणि जर्मनीत उपलब्ध आहे. आपल्या देशात ही प्रक्रिया खूप महाग असल्याने चित्रपटाची रेंडरिंग जर्मनीतून करण्यात आली आहे.
अशी सूचली चित्रपट कथा
 अझहर खान यांच्या शिक्षण संस्थेतील अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाèया शिक्षकांनी घोडे आणि हत्तीचे जिवंत चित्र संगणकाच्या स्क्रीनवर तयार केले आणि या चित्रातूनच अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याची प्रेरणा घेऊन लातूरकर असलेल्या निर्माता, दिग्दर्शक अजहर खान यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अ‍ॅनिमेशनपट तयार करण्याचा निश्चय केला आणि चार वर्षांत त्यांनी हा आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण करून अ‍ॅनिमेशनपटातून शिवरायांचे चरित्र मांडले.
                     
                                                      -  संपादन : शिवाजी कांबळे,मोबा ९०११३०८५८०

माक्र्स आणि आंबेडकरवादाचे ‘फ्युजन'


..............................................................
 लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या उभ्या आयुष्यात जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा यांच्या सीमा तोडून दीन-दलितांसाठी त्यांनी आपली लेखणी झिजविली. दलित, पीडित, शोषित, बहिष्कृत, तिरस्कृत, कष्टकरी बहुजन समाजाच्या गुलामीचे, बंडाचे, जगण्याचे चित्रण अफलातून निर्माण केले. आज त्यांची जयंती. त्यांची जयंती कर्मकांड ठरू नये म्हणून त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच अण्णा भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल.
..........................................................
लोकशाहीर, साहित्यरत्न क्रांतिवीर  तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक लोकशाहीर, कथा-कादंबरीकार म्हणून परिचित असले तरी ते क्रांतिकारी विचारवंत, राष्ट्रनिर्माते होते.  मानवमुक्तीच्या लढ्यासाठी समाजपरिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाèया अण्णा भाऊंची मात्र जिवंतपणी आणि निर्वाणानंतरही उपेक्षा झाली असली तरी त्यांच्या विचारांची धग आजही समाजमनात कायम आहे पण आज आम्ही महापुरुषांची वाटणी करून घेतली असून त्यांच्या नावाखाली निरर्थक वाद निर्माण करून चळवळीचे तीनतेरा करीत आहोत. एकमेकांपासून दूर जात आहोत. तो मांग आहे, तो महार आहे, मातंग समाजातील अण्णा भाऊंचे समर्थक म्हणवून घेणारे आंबेकरवाद्यांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात तर काही आंबेडकरवादी मातंगांना हीन लेखतात. एवढेच नाही तर बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारांमध्येही काही अंशी अशीच स्थिती आहे. त्यामुळेच परिवर्तनवादी बहुजनांच्या चळवळींची वाताहत झाली. आताशा तर पावसाळ्यातल्या छत्र्याप्रमाणे चळवळ गटा-गटांत विखुरलेली दिसून येत आहे.  काही ना-लायक नेत्यांनी जाती-पोटजातीचे सुरू केलेले राजकारण, समाजकारणच त्याला कारणीभूत आहे. तथागत गौतम बुद्ध, समतावादी लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची गुंफण एक आहे हे अद्यापही समाजमनात रुजलेच नाही.
      या थोर महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसवून त्यांना संकुचित करणे  हे वैचारिक दारिद््रय नाही तर काय? व्यक्तिपूजक बनण्यापेक्षा या महापुरुषांचे विचार आचरणात आणणे ही खरी काळाची गरज आहे. अण्णा भाऊ कम्युनिस्ट होते की आंबेडकरवादी होते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र चर्चा करणाèयांनी कितीही चर्चा केली तर ती निरर्थकच ठरेल यात शंका नाही. कारण अण्णा भाऊ माक्र्स आणि आंबेडकरवादाचे एक रसायन होते  हेच  चर्चेअंती स्पष्ट होईल.परवा नामवंत आंबेडकरी विचारवंत आणि नाटककार दत्ता भगत यांनी एका वृत्तपत्रातील लेखात आपणास माक्र्सबद्दल अपार आदर असल्याचे नमूद करीत माक्र्सवादाला विरोध करणाèया पोथीनिष्ठ आंबेडकरवाद्यांचा समाचार घेतला. भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीविरोधात माक्र्सचे विचार होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यांसमोर भारतातल्या जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामीचे स्वरूप होते. अण्णा भाऊ  कम्युनिस्ट होतेच पण ते आंबेडकरवादी होते हे त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने जाणवते. कारण देशाच्या अधोगतीस जात हीच संकल्पना कारणीभूत आहे. जातीच्या गुलामगिरीतून बाहेर पडल्याखेरीज सामान्य लोकांची प्रगती होणार नाही.
    अण्णा भाऊंनी या जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला. जात, वर्ण, भेद यांच्या सीमा त्यांनी नाकारल्या.  अण्णा भाऊंनी शाहिरी, कथा-कादंबरी, तमाशाला  प्रतिष्ठा मिळवून दिली. याच कलांच्या माध्यमातून त्यांनी कष्टकरी जनतेत अन्याय-
अत्याचारांविरुद्ध जागृती आणली. सामाजिक न्यायासाठी ते आयुष्यभर झगडले. आपल्या साहित्यातून सत्याला महत्त्व दिले. अण्णा भाऊंनी क्रांतिqसह नाना पाटील यांचे रेठरे (बु.) च्या जत्रेतील तमाशाच्या फडात भाषण ऐकले. तेव्हा अण्णा भाऊ हे त्यांचे मावसभाऊ बापू साठे यांच्या तमाशा फडात काम करीत होते. तेव्हापासून अण्णा भाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा मिळाली. अण्णा भाऊंचे कुटुंब सांगलीहून मुंबईला आले आणि अण्णा भाऊ कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले. या काळात त्यांची वैचारिक जडणघडण झाली.  तद्नंतर ‘चले जावङ्क चळवळीत ते सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध वॉरंट निघाले आणि  अण्णा भाऊंना कायमचे घर सोडावे लागले. त्यानंतर अण्णांनी मुंबई गाठली आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. पक्षाच्या प्रचारासाठी १९४४ मध्ये त्यांनी ‘लाल बावटाङ्क  कलापथकाची स्थापना केली. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर होते. अण्णांचे लिखाण  मात्र अखंडपणे सुरूच होते. दरम्यानच्या काळात ते रशियाचा दौराही करून आले. अण्णा भाऊंचा लढा सर्वांना माहीत असलाच पाहिजे आणि हे गृहीतच आहे. अण्णा भाऊंची जयंती कर्मकांड ठरू नये. अण्णा भाऊंची समतावादी, मानवतावादी चळवळ पुढे नेण्यासाठी आपणांस अण्णा भाऊ थांबले त्यापुढचे पाऊल टाकायचे आहे. हा दृढ निर्धार अण्णा भाऊ आणि बाबासाहेबांच्या समर्थकांनी करण्याची खरी वेळ आहे. अण्णा भाऊ  साठे यांच्या जयंती- निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन !!!
             
                                                                                          -शिवाजी कांबळे
                                                                                                 ९०११३०८५८०

Translate